‘आविष्कार’ निर्मित, शफाअत खानलिखित आणि प्रदीप मुळ्ये दिग्दर्शित ‘ड्राय डे’ नाटकातील पात्रांच्या तोंडची ही वाक्यं! ही पात्रं, त्यांची (असलीच तर) जगावेगळी गोष्ट वगैरे सगळंच मूर्त-अमूर्ततेच्या संदिग्धतेत झुलणारं. बाह्य़ात्कारी जरी ही पात्रं वास्तवदर्शी वाटत असली तरी ती तशी नाहीत. ती कशाची तरी प्रातिनिधिक रूपं आहेत. त्यांची गोष्टही आगळीच आहे.

*‘‘मूळ संस्काराचाच काहीतरी प्रॉब्लेम आहे. बालपणापासूनच ‘हे विसर, ते विसर’ असे संस्कार झाले. म्हणजे आई-वडील मार मार मारायचे. पण ते विसरून त्यांच्यावर प्रेम करावं लागायचं. शाळेत मास्तर बडवायचे. पण ते विसरून त्यांचे पाय धरायला लागायचे. सारखा सतत ‘विसरा- विसरा’ असा धोशा सुरू असायचा. विसरा आणि प्रेम करा. तर समाजाला विसरायची सवय लागली. अल्झायमरच झाला..’’
*‘‘खोटय़ानं मनाला बरं वाटतं. खऱ्यानं तोल जातो. सुशिक्षित झाला की माणसाचं सगळं डेअरिंगच जातं.’’
*‘‘कोंबडा सारखा आरवतो म्हणजे आपण उठलो नाही असं त्याला वाटत असणार!’’   – इति रायटर.
*‘‘रायटर, लिखो. सोचो मत. सोचनेवाला सब बर्बाद हो गया. नाटक तुम्हारे भीतर छुपके बैठा है. उसको बाहर निकालो. अंदर क्या है? बडा डम्पिंग ग्राऊंड! कचरा का पहाड! उस कचरा को बाहर निकालो. कचरा को डेकोरेट करो. सजाओ. चमकाओ. उसको आर्ट बोलताय. रायटर को जेन्युइन लायर होना चाहिए. लाय, झुठा, खोटा इसपर उसको भरोसा होना चाहिए. उसपर उसकी श्रद्धा होनी चाहिए.’’
*‘‘अपने पास भाषा नहीं. ‘आओ, बैठो, खाओ, पिओ, एन्जॉय करो, बिल भरो’ ऐसा अपना भाषा! इतना भाषा में बम्बै में मैंने तीन बार बनाया. कितना? तीन! इससे ज्यादा भाषा का जरूरतही नहीं है.’’
*‘‘पुलीस गांधी बनताय तो सोसायटीकू प्रॉब्लेम होताय. पुलीसवाला पाटील के इमानदारी के चलते पुरा बॉम्बे का डेव्हलपमेंट रूक गया है. पुरा इकॉनॉमी का सत्यानाश हो गया है.’’    – इति बारमालक शेट्टी.
.. वरवर पाहता ही विधानं अमूर्त, निर्थक, मूर्खपणाची वाटणारी असली तरी त्यांत खूप गहन अर्थ भरलेला आहे. भोवतालच्या सद्य:परिस्थितीतील भेदक, भीषण सत्यं मांडणारी आहेत ती, यात शंका नाही. ती कोण व्यक्त करतंय, याला फारसं महत्त्व नाहीए. परंतु ती खरी आहेत. शंभर टक्के खरी आहेत. कुणाही विचार करणाऱ्या, संवेदनशील माणसाला पटणारी आहेत.

या नाटकातला रायटर जिथं राहायला जातो तिथल्या लोकांची स्वप्नंच गायब होतात. पूर्वी तो ड्रीम सोसायटीत राहत असे. तिथल्या न्यायाधीश, कमिशनर, मंत्री, संपादक, डॉक्टर, विश्वसुंदऱ्या वगैरे उच्चभ्रू रहिवाशांना अचानक स्वप्नं पडणंच बंद होतं. त्यामुळे ते हैराण होतात. ते या गोष्टीचा छडा लावायचं ठरवतात तेव्हा नव्यानं तिथं वास्तव्याला आलेल्या एका मराठी लेखकानं आपली स्वप्नं चोरल्याचं त्यांना आढळून येतं. ते पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार करून मुंबईतून त्याला हद्दपार करतात.
 मुंबईपासून दूर, गरीब, अडाणी, अशिक्षितांच्या वस्तीत तो राहायला गेल्यास तिथल्या लोकांची बेचव स्वप्नं चोरण्यानं त्याच्या हाती काहीच लागणार नाही म्हटल्यावर लेखकाची ही सवय मोडेल असं इन्स्पेक्टर पाटलांना वाटतं. पण तिथल्या लोकांनाही स्वप्नं पडणं बंद होतं. त्यांच्या स्वप्नांत नकोसे बदल होतात. त्यामुळे तिथली माणसंही लेखकावर उखडतात. या भानगडींत लेखकाला नवं काही सुचेनासं झालेलं. तशात त्याचं प्रेमपात्र असलेली अभिनेत्री त्यानं आपल्यासाठी नाटक लिहून द्यावं म्हणून त्याच्या डोक्यावर बसलेली. तिनं दिलेली डेडलाइन संपत आलीय. नाटक लिहून दिलं नाही तर ती आपल्याला आयुष्यातून उठवणार, हे तो समजून असतो. पण त्याला काही सुचतच नाहीए, तर तो तरी काय करणार? त्यात आणखीन आपल्याला विस्मरणाचा विकार झालाय अशी त्याची खात्री पटत चाललेली. या सगळ्यानं तो भलताच कावलाय. दुसरीकडे : आपल्याला एक शब्दही सुचत नसताना आपली बायको मात्र आपल्या परोक्ष सतत काहीतरी लिहिण्यात गुंतलेली असते असं त्याच्या लक्षात येतं. काय, ते मात्र कळत नाही. ती आपलं लिखाण त्याच्यापासून दडवून ठेवते. त्यानंही लेखक अस्वस्थ, बेचैन असतो. सगळ्याच बाजूनं कोंडी झालेली. लेखकाला एक ठिकाण मात्र निवांत वाटतं, ते म्हणजे- शेट्टीचा बार. शेट्टीला त्याच्याबद्दल सहानुभूती आहे. तोच या समस्येवर काहीतरी उपाय काढेल, या आशेनं लेखक बारमध्ये जातो, तर गांधी जयंतीमुळे बार बंद! पण शेट्टीला लेखकाची काळजी असल्यानं बार बंद असूनही तो त्याची अडचण दूर करतो. त्याला शांतपणे लिहिता यावं म्हणून बारमधल्या एका खोलीत त्याची व्यवस्था करतो. पण..
‘ड्राय डे’! नाटकाच्या नावातच एक वांझोटेपण.. रीतेपण अभिप्रेत आहे. लेखकाला काहीही न सुचणं हे एक प्रकारे त्याचं वांझोटेपणच. लोकांची स्वप्नं गायब होणं म्हणजे तरी काय? जगण्याला अर्थ न उरणं.. दुसरं काय? हेच भीषण वास्तव मांडायचंय लेखकाला नाटकात. परंतु त्यासाठी चोथा झालेलं कथानक, ठोकळेबाज पात्रं, अर्थ गमावलेले शब्द, अपेक्षित घटना-प्रसंग वगैरेत त्याला अडकायचं नाहीए. कारण असलं काही लोकांना आज गुंतवून ठेवू शकत नाही. यापेक्षा संपूर्ण वेगळं, अनपेक्षित, चाकोरीबाहेरचं असं काही दिलं तरच ते त्यांना धरून ठेवेल याची त्याला जाणीव आहे. म्हणूनच असं अनोळखी कथानक, वरकरणी ओळखीची वाटणारी, पण अनपेक्षित उद्योगांत गुंतलेली पात्रं निर्माण करून त्यांना ‘ड्राय डे’ या सस्पेन्स थ्रिलरमध्ये शफाअत खान यांनी गुंतवलं आहे.
पात्रांच्यात आपापसात जे घडतं ते प्रेक्षकांना गुंगवतं. आपण काही भन्नाट अनुभवतो आहोत याची खात्री पटते. समोर घडणाऱ्या घटनांआड खूप काही दडलेलं आहे; जे खरं तर नाटककाराला सांगायचं आहे, मांडायचं आहे. त्यासाठीच त्यानं हा सारा घाट घातलेला आहे, हे आपल्याला हळूहळू कळत जातं. नाटक एन्जॉय करता करता प्रेक्षकाला त्यातला उपरोध, उपहास नकळत जाणवतो. त्यामुळे मग सदसद्विवेकबुद्धीचा सतत आरवणारा कोंबडाही लख्खपणे ओळखता येतो. त्याला ठार करण्याची सुपारी दिल्याविना आजच्या बरबटलेल्या जगाला निवांतपणे झोप लागणं शक्य नाही, हेही समजतं. लोकांची विसरायची सवयही आपण प्रत्यही अनुभवतो. म्हणूनच तर कायद्याच्या रक्षकाला लाथाबुक्क्य़ांनी तुडवणाऱ्या लोकप्रतिनिधींची निर्दोष सुटका होते आणि त्या रक्षकाची दूर बदली होते.
आपल्यावर लहानपणापासून हे-ते विसरण्याचे संस्कार झालेले असल्यानं हे सगळं आपण पुढच्या निवडणुकीत विसरलेले असणार, हे लोकप्रतिनिधींना पक्कं माहीत असल्यानं त्यांना पुन्हा निवडून येण्याची बिलकूल चिंता नाही. डान्सबार बंद झाल्यानं अनेकांची ‘डेव्हलपमेंट’ थांबते, त्यामुळे असंख्यांची ‘इकॉनॉमी’ गोत्यात येते, तेव्हा असलं काही ‘समाजविघातक’ घडता नये याची खबरदारी संबंधित डोळ्यांत तेल आणून घेतात. लेखकही याच सापळ्यात अडकलाय. कारण जुनी, चोथा झालेली भाषा, झिजलेले, निर्थक शब्द, तीच ती गुळगुळीत गोष्ट यांना आज बाजारात कुणी पुसत नाही. तेव्हा काहीतरी नवं, आगळंवेगळं निर्माण करायला हवं; जे लोकांना गुंतवू शकेल. पण असलं अस्सल त्याला काही सुचतच नाहीए. दुसऱ्यांच्या स्वप्नांवर तरी डल्ला मारून किती काळ तगणार? तीही सगळी उसवून झालीयत. शेवटी ‘सुइसाइड नोट’वर लोकांना भुलवण्याची पाळी त्याच्यावर येते.
एक प्रकारे हा लेखकाचा मृत्यूच! नाटककार शफाअत खान यांचा नव्या रंगभाषेचा, वेगळ्या नाटकाचा ‘पोपटपंची’ नाटकापासून सुरू झालेला शोध व्हाया ‘गांधी आडवा येतो’ मार्गे आता ‘ड्राय डे’पर्यंत येऊन पोहोचला आहे. शफाअतरावांचं ‘गांधी..’ हे नाटक ‘अश्रूंची झाली फुले’च्या फॉर्ममध्ये कालौघात झालेल्या प्रचंड स्थित्यंतरांचं विरोधाभासी चित्रण करणारं होतं. (पण ते ‘परीक्षक’ नामक मठ्ठांना कळलंच नाही! असो.) त्यांची ‘पोपटपंची’ आणि ‘ड्राय डे’ ही नाटकं मात्र आजच्या माणसाचं भयंकर गुंतागुंतीचं अन् व्यामिश्र जगणं संपूर्णपणे नव्या, अनोळखी रंगभाषेत वास्तववादाच्या व्हच्र्युअल चित्रणातून मांडणारी आहेत. ती ज्यांना समजतील त्यांना समजतील. आणि नाहीच समजणार तेही चार घटका करमणूक म्हणून ती एन्जॉय करू शकतील अशी ‘टु इन् वन’आहेत.
दिग्दर्शक प्रदीप मुळ्ये यांना हे नाटक सर्वार्थानं आकळलंय, हे प्रयोगात पदोपदी जाणवतं. नाटकाचा आशय धारदार करताना ध्वनिचित्रफितींचा केलेला वापर वरकरणी करमणूप्रधान वाटला, तरी तो इतका चपखल आहे, की आजवरच्या कुठल्याही नाटकांत तो तसा झालेला नाही. ठाशीव व्यक्तिचित्रण, तसंच पात्रांच्या हालचाली व व्यवहारांतून त्यांचं सामाजिक स्थान आणि मनोवृत्ती अधोरेखित होईल याची दक्षताही त्यांनी घेतली आहे. वरवर नाटक वास्तववादी वाटलं तरी हरकत नाही, पण त्यातला गर्भित आशय प्रेक्षकांना भिडला पाहिजे, हे त्यांनी पाहिलं आहे. राहुल रानडे यांच्या संगीताचं आणि अजय पुजारे यांच्या नेपथ्याचं याकामी त्यांना मोलाचं साहाय्य झालं आहे. रवी-रसिक यांची प्रकाशयोजनाही नाटकातला थरार वाढवणारी.
कलाकारांना नाटक कळल्याशिवाय ते प्रेक्षकापर्यंत पोचणं अशक्य. या नाटकाची जातकुळी आत्मगत करून त्यात अनुस्यूत असलेला आशय पोचवण्यासाठी घ्यावी लागणारी बौद्धिक व कलात्मक मेहनत कलाकारांनी पुरेपूर घेतली आहे. मंगेश कदम यांचा बारवाला शेट्टी अविस्मरणीय. त्यांची संवादफेक, फोन आल्यावर परमेश्वराचं स्मरण करून तो भक्तिभावानं घेणं- यांतून शेट्टीचं व्यक्तिमत्त्व त्यांनी अचूक टिपलंय. दीपक दामलेंनी संभ्रमित, कातावलेला, भयभीत रायटर असंबद्ध व तुटक बोलण्यातून, पोकळ आव आणण्यातून उत्तम साकारलाय. पैसा आणि सत्तेतून आलेलं माजोरडेपण, उद्दामपणा ड्रीम सोसायटीचा सेक्रेटरी झालेल्या महेश जोशींनी ताठय़ात उभा केलाय. इन्स्पेक्टर पाटलांच्या भूमिकेत दीपक कदम यांनी खाकी वर्दीचा माज आणि उसनी इमानदारी यांतलं द्वंद्व छान दाखवलंय. विक्रांत कोळपेंचा टेक्निशियनही लक्षवेधी.

Story img Loader