पाण्याचा वापर टाळून केवळ रंगांच्या उधळणीने होळी साजरी करीत संवेदनशील मुंबईकरांनी महाराष्ट्राच्या अध्र्या भागाला जाणवणाऱ्या दुष्काळाच्या झळांची जाणीव आम्हालाही असल्याचा संदेशच जणू बुधवारी दिला. काही ठिकाणी पाण्याचा वापर करणाऱ्यांची लोकांनीच खरडपट्टी काढली. विदर्भ, मराठवाडय़ाला दुष्काळाच्या काळया गडद सावलीने काळवंडून टाकले आहे. त्यामुळे, यंदाची होळी केवळ रंग उधळून कोरडी साजरी करावी, याबाबत अनेक गृहनिर्माण सोसायटय़ा वा चाळींमध्ये आठवडाभर आधीपासूनच चर्चा सुरू होती. थेट मुख्यमंत्र्यापासून समाजातील अनेक मान्यवर व्यक्ती, पोलिस, स्वयंसेवी संस्था यांच्याकडून वारंवार या प्रकारचे आवाहन करण्यात येत होते. बहुतेक मुंबईकरांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत कोरडी होळी साजरी केली. सोसायटय़ा, चाळी, वस्त्या, रस्त्यारस्त्यावर बुधवारी उत्साहात साजऱ्या केल्या गेलेल्या होळीत लाल, हिरव्या, पिवळया रंगांची उधळण तर खूप होती. पण, स्विमिंग पूल किंवा पाण्याचे हंडेच्या हंडे रिते करून समोरच्याला नखशिखांत भिजवून हा रंगाचा सण साजरा करण्याचे अनेकांनी टाळले. मुलांनाही पाणी जपून वापरा रे, असे आवर्जून सांगितले जात होते.
अनेक सोसायटय़ांमध्ये संगीताच्या ठेक्यावर ताल धरला गेला. तर काही ठिकाणी हौजी, पत्त्यांचे डाव, संगीत खुर्ची असे खेळ काही ठिकाणी रंगले होते. ‘आईना का बाईना’ म्हणत तरूणांचे घोळके ढोलकी वाजवित होळीची जाणीव करून देत होत होती. केवळ दारूची आणि खाद्यपदार्थाची दुकाने वगळता अन्य दुकाने ग्राहकांविना ओस पडली होती.
फुगे मारणाऱ्यांवर
कारवाई नाहीच!
फुगे मारणारा आढळला तर थेट तुरुंगात टाकले जाईल, असा मुंबई पोलिसांनी दिलेला इशारा पोकळच ठरला. काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या लहान पिशव्यांमध्ये पाणी भरून त्या रस्त्यावरील येणाजाणाऱ्याला मारल्या जात होत्या. पण, तक्रार करूनही पोलिस याची दखल घेत नव्हते. सर्वत्र नाकाबंदी आणि वाहतुक पोलिसांचा विशेष बंदोबस्त असूनही पश्चिम द्रुतगती महामार्गावर एका दुचाकीवर तिघेजण फिरताना दिसत होते. त्यांना कुठेही अटकाव केला जात नव्हता. पोलीस मद्यपि चालकांवरील कारवाईत गुंतले होते.
‘बुरा ना मानों.. होली है’ असे म्हणत एकमेकांच्या अंगावर रंग उधळण्याची संधी मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार अजिबात सोडत नाहीत. रेन डान्स, पाण्याचा हौद, लाल-निळा-पिवळा-हिरवा अशा विविध रंगांची उधळण, खाण्यापिण्याची रेलचेल अशा धम्माल वातावरणात दरवर्षी रंग उधळणाऱ्या कलाकारांनी यंदा मात्र सामाजिक भान बाळगत कोरडी धुळवड साजरी केली.
महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पडलेला भीषण दुष्काळ, पाणीटंचाई, चारा छावण्या हे वास्तव केवळ आपल्या चित्रपटांतच न दाखवता कलाकारांनी यातील आपला वाटाही उचलला. बुधवारी सकाळी जोगेश्वरी लिंक रोडवरील मातोश्री क्लबमध्ये धुळवडीचे रंग उधळण्यासाठी एकत्र जमलेल्या कलाकारांनी पाण्याचा वापर टाळत लोकांसमोरही आदर्श उभा केला.
महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर यंदा मुंबईकरांनी कोरडी धुळवड करावी, यासाठी विविध स्तरांवर प्रचार सुरू होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पथनाटय़ांपासून महाराष्ट्र सरकारने केलेल्या जाहिरातींपर्यंत सर्वानीच कोरडी धुळवड साजरी करण्यावर भर दिला होता. यातूनच धडा घेत जयवंत वाडकर यांनी आयोजित केलेल्या या कलाकारांच्या धुळवडीत पाण्याचा कमीत कमी वापर करण्यात आला. सकाळी साडेअकरा वाजल्यापासून एक एक कलाकार एकत्र जमायला लागले. एकमेकांवर कोरडे रंग उधळून धुळवडीची मस्ती सुरू झाली. मात्र या धुळवडीला खरा रंग चढला तो पुष्कर श्रोत्री, जीतेंद्र जोशी, विजय कदम, संतोष जुवेकर, अवुधत गुप्ते हे मैदानात उतरल्यानंतर!
यंदाच्या मराठी कलाकारांच्या धुळवडीत प्रकर्षांने जाणवलेली गोष्ट म्हणजे सिनेतारकांची अनुपस्थिती! हर्षदा खानविलकर, पल्लवी सुभाष, मेधा घाडे यांचा अपवाद वगळता इतर सिनेतारका या धुळवडीसाठी आल्याच नाहीत. सुबोध भावे, अनिकेत विश्वासराव, जयवंत वाडकर, विजय पाटकर या अभिनेत्यांनीही धुळवडीत सहभाग घेतला. अभिजीत खांडकेकरने सपत्नीक धुळवडीचा आनंद लुटला. या पडद्यावर दिसणाऱ्या कलाकारांसह नीलेश मोहरीर, जाह्न्वी प्रभू-अरोरा, अजित परब, मंगेश बोरगावकर, छायाचित्रणकार संजय जाधव हेदेखील हिरहिरीने रंग उधळत होते. सकाळी साडे अकरापासून चालू झालेला हा रंगकल्लोळ उन्हे उतरेपर्यंत सुरू होता.

Story img Loader