माण नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा माण तालुक्यात २८ मे रोजी येत आहेत. दुष्काळी माण तालुक्यात कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा एक भाग म्हणून नेहमीच कोरडी राहणाऱ्या माण नदीचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालय व ‘जल-बिरादरी’ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. माण तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माण तालुक्यातल्या मध्यातून वाहणारी माण नदी सोलापूर व सांगली जिल्ह्य़ात वाहते. अंदाजे ६५ कि.मी. परिसरात वाहणारी ही नदी परतीच्या पावसात दुथडी भरून वाहते. कुळकजाई, सांगोला, आटपाडी तालुक्यातून ही नदी वाहते. गेल्या दोन वर्षांत पावसाने हुलकावणी दिल्याने पाण्याचे स्रोत आटले आहेत. त्यामुळे लोकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नदीकिनारी असणाऱ्या गावांना नदीचा बारमाही पाण्यासाठी उपयोग व्हावा असा प्रयत्न आहे.
यापूर्वी नदीची नांगरणी करून पाणी मुरविण्याचा प्रयत्न झाला. तसेच नदीपात्रात व पात्रालगत ३५२ छोटय़ा-मोठय़ा बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आली होती. या दोन्ही प्रयत्नांना यश मिळाले व आजूबाजूच्या विहिरींच्या पातळीत वाढ झाली होती. नदीकिनारी राहणाऱ्या लोकांनी हा प्रयोग राबवला असता तर पाण्याचे स्रोत वाढले असते. परंतु आता नदी परिसरात राहणाऱ्या सर्व गावांनी या कामी पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील समन्वयक श्रीराम नानल, माणचे तहसीलदार रांजणे राजस्थानातील वाळवंटातही पाण्याचे झरे टिकवून ठेवण्याचा यशस्वी प्रयोग करणारे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह राणा यांना कुळकजाई बिदाल,
गोंदवलेसह परिसरात दाखविण्यात येणाऱ्या ठिकाणांची पाहणी केली. या परिसरात अनेक बंधारे, गाव तलाव, पाझर तलाव आहेत. या तलावातील गाळ काढणे, गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करणे तसेच माण नदी बारमाही वाहती राहण्यासाठी प्रयत्न करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. या प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध करून घेण्यात येणार आहे.

Story img Loader