डीएसके उद्योगसमूह आगामी काळात हेलिकॉप्टर वाहतूक, हेलिकॉप्टर जोडणी आणि साखळी रेस्टॉरंट या व्यवसायांत उतरणार असून, येत्या पाच वर्षांत विविध क्षेत्रांत सुमारे दहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
समूहाचे संचालक शिरीष कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. बुधवारी डीएसके समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डी. एस. कुलकर्णी यांच्या हस्ते समूहाच्या नवीन लोगोचे अनावरण करण्यात आले. ‘डीएसके सुपइन्फोकॉम’च्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हेमंती कुलकर्णी, शिरीष कुलकर्णी, डीएसके सुपइन्फोकॉमच्या सहव्यवस्थापकीय संचालक तन्वी कुलकर्णी आदि या वेळी उपस्थित होते. शिरीष कुलकर्णी म्हणाले, ‘‘विमान जोडणीबाबत एका कंपनीशी डीएसके समूहाची बोलणी सुरुवातीच्या टप्प्यात आहेत.हेलिकॉप्टर्सची जोडणी करण्याच्या व्यवसायात उतरण्याचा समूहाचा मनोदय असून पुण्यात तळ करून हेलिकॉप्टर वाहतूक सेवाही सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. तसेच येत्या काही वर्षांत डीएसके समूह साखळी रेस्टॉरंट व्यवसायातही उतरेल. डीएसके समूह सध्या ‘हीनो’ या कंपनीबरोबर ट्रकच्या विक्री व्यवसायात असून, या ट्रकची निर्मिती भारतात करण्याच्या दृष्टीने येत्या वर्षभरात हालचाली अपेक्षित आहेत. ‘ह्य़ोसांग’ कंपनीबरोबर समूहाचा मोटारसायकल निर्मितीचा व्यवसाय आहे. स्वत:ची मोटारसायकल निर्मिती सुरू करण्यासाठी समूहाचे प्रयत्न सुरू असून २०१५-२०१६ सालापर्यंत ही कल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल. सध्या समूहाची एकूण उलाढाल चार हजार कोटी रुपये आहे. समूह येत्या पाच वर्षांत विविध क्षेत्रांत दहा हजार कोटींची गुंतवणूक करणार असून दोन-तीन वर्षांत समूहाची उलाढाल पन्नास हजार कोटी रुपयांवर जाईल.’’ न्यूयॉर्क शहरात दीडशे मजली इमारत बांधण्याचे आपले स्वप्न असल्याचे डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले. पुण्यात दीडशे मीटर उंच (४० ते ४२ मजली) गृहबांधणी प्रकल्प उभारण्यास परवानगी मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून संधी मिळाल्यास अशा प्रकारचा गृहबांधणी प्रकल्प उभारण्याचा कंपनीचा मनोदय असल्याचेही ते म्हणाले.