ग्रंथालयात वाचक येण्याची वाट पाहत बसण्यापेक्षा सहकारी बँका, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींच्या मदतीने मराठी वाङ्मय संपदाच थेट विनामूल्य तत्त्वावर वाचकांच्या घरात उपलब्ध करून देणाऱ्या नाशिक येथील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’च्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ हा उपक्रम आता देशाची सीमा ओलांडून आखाती प्रदेशात जाणार आहे.
दुबई येथील डॉ. संदीप कडवे यांच्या सहयोगाने तेथील मराठी वाचकांसाठी प्रत्येकी शंभर पुस्तके असणाऱ्या आठ पेटय़ा उपलब्ध करून दिल्या जाणार असून येत्या २० जून रोजी समारंभपूर्वक या उपक्रमाचे उद्घाटन होणार आहे. दुबईतल्या पेटय़ांद्वारे ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रम ४९० पेटय़ांचा टप्पा गाठणार आहे. येत्या ऑगस्टमध्ये ५०० पेटय़ांसह एक कोटी रुपयांची पुस्तके या उपक्रमाद्वारे वाचकांच्या हाती जातील, असा विश्वास या उपक्रमाचे संयोजक विनायक रानडे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केला.
शिक्षित परंतु मराठी साहित्यापासून दूर राहिलेल्या वाचकांना वाङ्मयाची गोडी लावण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमास वाचक आणि देणगीदार दोघांनीही चांगला प्रतिसाद दिला असल्याची माहिती रानडे यांनी दिली. या उपक्रमातील सर्वाधिक ५५ पेटय़ा टीजेएसबीच्या सहयोगाने ठाण्यातील वाचकांना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे डीएनएसबी आणि आता अंबरनाथ जयहिंद को-ऑप. बँकेनेही ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईप्रमाणेच लवकरच बेळगांवमध्येही ग्रंथ तुमच्या दारी उपक्रम दोन पेटय़ांद्वारे पोहोचणार आहे. विशेष म्हणजे गजानन जोग आणि अशोक भावे या दोन ठाणेकरांनी बेळगांवमधील पेटय़ा प्रायोजित केल्या आहेत. दहा मिनिटांच्या अंतरावर राहणाऱ्या ३५ वाचकांच्या समूहास शंभर पुस्तकांची पेटी चार महिन्यांसाठी दिली जाते. दर चार महिन्यांनंतर पेटी बदलली जाते.