चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातील फ्लायअ‍ॅश वाहून नेणारी अ‍ॅशबंडची पाइपलाइन फुटल्याने संपूर्ण राख इरई नदीत जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्थानिक पर्यावरणवाद्यांनी हा गंभीर प्रकार निदर्शनास आणून दिल्यानंतर उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत या भागाची पाहणी करून वीज केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रदूषण हटाव चंद्रपूर बचावसाठी उद्या, सकाळी ९ वाजता गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विद्युत केंद्रात वीजनिर्मितीसाठी दररोज ३५ हजार टन कोळसा जाळण्यात येतो. त्यानंतर त्याची फ्लायअ‍ॅश तयार होते. ती अ‍ॅश पाइपलाइनमधून वीज केंद्राला लागूनच तयार करण्यात आलेल्या अ‍ॅशबंडमध्ये सोडण्यात येते. ही फ्लायअ‍ॅश काही प्रमाणात सिमेंटमध्ये मिश्रित करण्याची परवानगी आहे. त्यामुळे स्थानिक सिमेंट उद्योग ती टॅंकरने घेऊन जातात. गेल्या कित्येक वर्षांपासून फ्लायअ‍ॅशची अशा पद्धतीने विल्टेवाट लावली जात आहे. ही राख विषारी असल्यामुळे त्याचा केवळ सिमेंट व विटा तयार करण्यासाठीच उपयोग होते. या फ्लायअ‍ॅशमुळे वीज केंद्राच्या परिसरातील शेती उद्ध्वस्त झाली आहे. तेथे काहीच पीक घेता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मात्र, दोन दिवसापूर्वी फ्लायअ‍ॅश सोडतांना राख वाहून नेणारी पाइपलाइन फुटल्याने संपूर्ण फ्लायअ‍ॅश इरई नदीत गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
वीज केंद्रातील रासायनिक द्रव्यामुळे इरई नदीचे पाणी दूषित झाल्याचे वृत्त लोकसत्तात प्रकाशित झाले. नगरसेवक संजय वैद्य, पर्यावरणप्रेमी प्रा.सुरेश चोपने यांना इरई नदीतील पाणी पिवळे व लाल रंगाचे दिसले. त्यांची याचा पाठपुरावा केला असता ही गंभीर बाब उघडकीस आली. याची दखल घेत उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी पाटील, प्रा. सुरेश चोपने व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथकाने काल गुरुवारी इरई नदी व अ‍ॅशबंड परिसराची पाहणी केली असता तीन ते चार ठिकाणाहून रासायनिक द्रव्य नदीच्या पात्रात झिरपत असल्याचे निदर्शनास आले. तसेच फ्लायअ‍ॅश वाहून नेणारी मोठी पाइपलाइन दोन-तीन ठिकाणी फुटलेली होती. त्यामुळे फ्लायअ‍ॅश अ‍ॅशबंडऐवजी थेट इरई नदीत जात होती. त्यामुळे इरई नदीचे पात्र पूर्णत: पांढरे झाले आहे. वीज केंद्रापासून तर पडोली, वडगांव, दाताळा, बिनबा गेटपासून तर थेट विठ्ठल मंदिरापर्यंत नदीतील पाण्यावर फ्लायअ‍ॅश स्पष्टपणे तरंगतांना दिसत आहे. हेच दूषित पाणी तुकूम व रामनगर येथील जलशुध्दीकरण केंद्रातून शहरातील लोकांना नळाव्दारे येत आहे. अ‍ॅशयुक्त विषारी पाणी पिल्याने अनेकांना घशाचा त्रास सुरू झालेला आहे. प्रदूषणामुळे आधीच शहरातील लोकांना कोरडा खोकला व दम्याचा आजार आहे. त्यात आता अ‍ॅशयुक्त अशुध्द पाणी प्यावे लागत असल्यामुळे आरोग्याचे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.
काल सायंकाळी सात वाजेपर्यंत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी अ‍ॅश बंड, फुटलेली पाईपलाईन, तसेच इरईतील अ‍ॅशयुक्त पाण्याची पाहणी केल्यानंतर आज सकाळी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राला कारणे दाखवा नोटीस बजावली असल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण अधिकारी पाटील यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली. या संदर्भात पाटील यांना अधिक माहिती विचारली असता गुरुवारी दिवसभर वीज केंद्रातून बाहेर पडणारे सांडपाणी, रासायनिक द्रव्य तसेच फ्लायअ‍ॅशच्या पाईपलाईनची पाहणी केली. काही ठिकाणी ती फुटलेली आहे. त्यामुळे ती थेट नदीत जात आहे. नदीत बहुतांश ठिकाणी तर फ्लायअ‍ॅशचे पक्के दगड तयार झालेले आहे. त्यामुळे इरई नदीच्या पाण्यावर सदैव पांढऱ्या रंगाचा अ‍ॅशचा थर असतो.
हेच पाणी शहरातील लोकांना पिण्यासाठी पुरवठा करण्यात येत असल्याने लोकांना सर्दी व दम्याचा त्रास सुरू झालेला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता वीज केंद्राने पाइपलाइन तातडीने दुरुस्त करून अ‍ॅश नदीत जाणार नाही, याची काळजी घ्यावी, असेही या नोटीसमध्ये नमूद करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, ही नोटीस वीज केंद्राला मिळताच महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. कालपर्यंत हे सर्व अधिकारी फ्लायअ‍ॅश नदीत सोडली जात नाही किंवा रसायनिक द्रव्यही नदीत सोडले जात नाही, असा दावा केला जात होता. मात्र, आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारणे दाखवा नोटीसमुळे अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे.
हॉटेल व दुकानांमुळे प्रदूषण
शहरातील हॉटेल व बीअर बार, तसेच दुकानांमुळेही मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा दावा पर्यावरणवाद्यांनी केला आहे. यातील शिळे अन्न नदीकाठी उघडय़ावर फेकण्यात येते. तसेच मांसाहारी पदार्थही जमिनीत गाडण्याऐवजी फेकले जातात. हेच अन्न नदीत जाऊन घराघरात नळाव्दारे येते. हेही प्रदूषण असल्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघडय़ावर व नदीकाठी अन्न फेकणाऱ्या हॉटेलमालकावर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. सोबतच वारंवार फ्लास्टिक जाळणाऱ्या व्यापाऱ्यांवरही कारवाई करावी. त्यामुळे हवेत प्रदूषण होत असल्याचा मुद्दाही पर्यावरणवाद्यांनी लावून धरला आहे.

Story img Loader