दहावीचे वर्ष हे आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे असते. त्यामुळे मनापासून अभ्यास करा आणि पुढील शिक्षण कोणत्या शाखेतून घ्यायचे याचा विचार करूनच नियोजन आखा. कारण शिक्षणामुळेच आर्थिक उन्नती साधता येऊ शकते, असे प्रतिपादन डोंबिवलीचे आ. रवींद्र चव्हाण यांनी केले. येथील महात्मा गांधी विद्यालयात नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लोकसत्ता यशश्वी भव योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दहावी मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले.
शालेय जीवनात अनेक विद्यार्थी १० वी वा १२वी पर्यंतच शिक्षण घेतात. मात्र त्यामुळे या विद्यार्थ्यांना पुढील जीवनात मर्यादीतच मजल मारता येते.  मात्र जर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतल्यास त्याच्या जीवनमानात नक्कीच फरक पडतो. त्यामुळे दक्षिणात्य लोक उच्च शिक्षण घेऊन आपली प्रगती करू शकतात तर आपणही अशाप्रकारे शिक्षण घेऊन जीवनस्तर उंचावू शकतो हे दाखवण्याची जबाबदारी आपल्यासारख्या विद्यार्थ्यांवर असल्याचे चव्हाण म्हणाले.
शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक घराची आर्थिक उन्नती झाली तर संपूर्ण देशाची  प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वासही चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला रेल चाईल्ड संस्थेचे कार्यवाह सुरेश खेडकर, म.गांधी शाळेचे शालेय समिती अध्यक्ष उल्हास झोपे, मुख्याध्यापिका रेखा उघाडे, पर्यवेक्षिका प्रेरणा अत्तरदे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

Story img Loader