अग्निसुरक्षा कायदा अस्तित्वात आल्यानंतर तब्बल नऊ वर्षांनी मुंबईतील उत्तुंग इमारतींमधील आग प्रतिबंधक उपाययोजनांबाबत पालिकेला जाग आली आहे. इमारतींमधील अग्निसुरक्षा यंत्रणेची वर्षांतून दोन वेळा तपासणी सक्तीची करण्यात आली आहे. मात्र अग्निशमन दलातील उत्तुंग इमारत कक्षासाठी मंजूर झालेली ३३ केंद्र अधिकारी पदे अद्यापही भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे इमारतींकडून उपकरणांसंदर्भात ‘प्रपत्र बी’मध्ये सादर केल्या जाणाऱ्या माहितीची तपासणी कोण करणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना अधिनियम’ कायदा २००६ मध्ये अस्तित्वात आला. तत्पूर्वीच मुंबईत उत्तुंग इमारतींची संख्या वाढू लागली होती. या इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची काटेकोरपणे पाहणी करण्यासाठी २०१२ मध्ये अग्निशमन दलाअंतर्गत उत्तुंग इमारत कक्ष स्थापन करण्यात आला. या कक्षासाठी ३३ नवी केंद्र अधिकाऱ्यांची भरती करण्यास प्रशासनाने मान्यता दिली. यामुळे उंच इमारतींमधील अग्निसुरक्षेबाबत कडक पावले उचलली जातील, असे मुंबईकरांना वाटत होते.
उत्तुंग इमारत कक्ष स्थापन केल्यानंतर आजतागायत ३३ केंद्र अधिकाऱ्यांनी नवी पदे भरण्यातच आली नाहीत. उलटपक्षी अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरच उत्तुंग इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांची तपासणी करण्याचे काम सोपविले गेले. आग विझविणे, अडकलेल्या पक्ष्यांची सुटका करणे, रस्त्यात सांडलेले ऑईल साफ करणे आदी कामांच्या जोडीला उंच इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणेच्या तपासणीच्या कामाचा भार त्यांच्यावर पडला. मात्र काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे काम भावले आणि त्यातच ते अधिक रमले.
एखाद्या इमारतीमध्ये तपासणी केल्यानंतर अग्निशमन दलातील अधिकारी अग्निशमन यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणून देतात. या त्रुटी दूर कराव्यात, असे नमूद करून संबंधितांना ‘ना हरकत’ प्रमाणपत्र देऊन टाकतात, परंतु त्यानंतर त्रुटी दूर केल्या की नाही हे तपासण्याची यंत्रणा अग्निशमन दलाकडे नाही. मुंबईतील वाढती लोकसंख्या, उंच इमारतींची संख्या लक्षात घेता अग्निशमन दलात अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे इमारतींमधील त्रुटी दूर केल्या की नाहीत याची पडताळणी होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. इमारतीमधील रहिवाशीही त्यात सुधारणा करण्यात टाळाटाळ करतात आणि दुर्घटना घडल्यानंतर ओरड होते. त्यानंतर पुन्हा अग्निसुरक्षेबाबत प्रश्न निर्माण होतो.कामाचा भार हलका करण्यासाठी उत्तुंग इमारत कक्षासाठी ३३ केंद्र अधिकाऱ्यांची तातडीने भरती करावी, अशी मागणी अग्निशमन दलातील अधिकारी-कर्मचारीच करू लागले आहेत. इमारतींमधील यंत्रणेची वर्षांतून दोन वेळा संबंधित प्राधिकरणांकडून तपासणी करून घेण्याबरोबरच उत्तुंग इमारत कक्ष बळकट केल्यास अनेक दुर्घटना टळू शकतील, असे मत अग्निशमन दलातील एका अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.