आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर विनायक मेटे यांनी मराठा आरक्षणाविषयी निव्वळ गाजावाजा करून दिशाभूल करणे थांबवावे. राजकीय स्वार्थासाठी सवतासुभा मांडून आरक्षण लढय़ाचे नुकसान न करता आरक्षणासाठी एकजुटीच्या लढय़ात सामील व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा मराठा सेवा संघाने केले आहे.
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने येथे अलीकडेच मराठा आरक्षण जागर मेळावा घेण्यात आला. त्या पाश्र्वभूमीवर मराठा सेवा संघाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मागील वर्षी संघाने छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षण परिषद घेतली होती.
आरक्षण कोणत्या मार्गाने मिळू शकते यावर मान्यवरांनी परिषदेत मंथन केले होते. यावेळी सर्व संघटनांनी एकत्र येण्याची हाक छत्रपती संभाजीराजे यांनी दिली होती. त्यानुसार पुणे येथे सर्व संघटनांची बैठक होऊन छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आरक्षण महामोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला ५४ आमदारांनी मंचावर येऊन पाठिंबा दिला होता.
मेटे यांनी विधीमंडळातील आयुधांचा वापर करून हा लढा लढणे अपेक्षित असताना फक्त राजकीय स्वार्थासाठी गाजावाजा करणे थांबवावे, असे आवाहन संघाने केले आहे. आरक्षणाच्या व्यापक लढय़ात सामील होऊन वेगळी चूल बंद करावी, जेणे करून आरक्षण लढय़ाचे नुकसान होणार नाही.
गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मेटे यांनी आरक्षणाबाबत घेतलेली भूमिका संभ्रम निर्माण करणारी होती. मुंबई येथील महामोर्चात सर्व मराठा संघटना सहभागी झाल्या असताना मेटे सहभागी झाले नव्हते, याची आठवणही मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हंसराज वडघुले यांनी करून दिली आहे.

Story img Loader