निवडणूक काळात आपण कोणाला मतदान करतोय याचा विचार समाजाकडून केला जात नाही. या उमेदवाराची पाश्र्वभूमी काय, त्याचे कार्य आहे याचा अंदाज आपण घेत नाही. केवळ भूलथापांना बळी पडून आपण उदासीन राहून मतदान करतो. त्यामुळे गुन्हेगार पाश्र्वभूमीच्या लोकप्रतिनिधींमध्ये वाढ होत आहे, असे प्रतिपादन ‘सक्रिय नागरिक मंच’चे निमंत्रक प्रा. उदय कर्वे यांनी रविवारी येथे केले.
राजकारण तसेच निवडणुकांसंबंधी तरुणांची भूमिका कोणती, हा विचार करून निवृत्त मेजर विनय देगांवकर यांनी ‘युवा राजकीय मंच’ स्थापन केला आहे. या मंचतर्फे ‘राजकारणातील सहभाग आवश्यकता आणि आवाहन’ विषयावर खुली चर्चा एव्हरेस्ट सभागृहात आयोजित केली होती. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, प्रा. उदय कर्वे, आम आदमी पक्षाचे प्रशांत रेडिज, मेजर विनय देगांवकर, देशपांडे उपस्थित होते.
देशातील एकूण आमदार, खासदारांवर विविध प्रकारचे ४ हजार ८०७ गुन्हे दाखल आहेत. १५०० जणांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. राज्यसभेतील १७ टक्के खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती देत प्रा.कर्वे यांनी हे सर्व लोकप्रतिनिधी देशाच्या राष्ट्रपतींची निवड करतात, असे सांगितले. आपण कोणत्या लोकशाहीत वावरत आहोत याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
पैसा, सत्ता आणि त्या माध्यमातून हक्काचे मतदार (कमिटेड व्होटर) आपल्या भागात तयार करायचे. विकासकामे करायची नाहीत, केवळ काही हुजऱ्यांची फौज ऊभी करायची आणि त्यातून आपलीच वाहवा करून घ्यायची सवय काही लोकप्रतिनिधींना लागली आहे. समाज या लोकप्रतिनिधींच्या मागे धावतो. या उदासीनतेमधून आपण मतदान करतो. म्हणून अशा प्रकारचे गुन्हेगार लोकप्रतिनिधी वर्षांनुवर्षे ठाण मांडून आपल्या परिसरावर वर्चस्व गाजवतात. या लोकप्रतिनिधींचा आता विचार करण्याची वेळ आली आहे, असे कर्वे यांनी सांगितले.
‘राजकारण हे बाबा आमटे, डॉ. अभय बंग यांच्या सामाजिक कार्यातूनसुद्धा केले जाते आणि पक्षीय पातळीवरही केले जाते. अण्णा हजारे करतात ते राजकारण आणि केजरीवाल करतात ते पक्षीय राजकारण असा फरक उलगडून दाखवत राजकारणाकडे समाज उपेक्षित नजरेने बघतो. स्वत: त्यात उतरत नाही. मग चांगल्याची अपेक्षा करून टीकास्त्र सोडतो. राजकारणाचे संदर्भ बदलत असताना तरुणांनी एक करिअर म्हणून राजकारणाकडे बघण्याची गरज आहे.
राजकारणाचे संदर्भ समजण्यासाठी विचारवंतांच्या राजकीय ग्रंथांचा अभ्यास होणे आवश्यक आहे, असे डॉ. कोल्हटकर यांनी सांगितले. प्रशांत रेडिज यांनी बदलते राजकारण, निवडणुकीतील सुधारणा या विषयावर अभ्यासपूर्ण विवेचन केले. सध्याच्या राजकारणावर उपस्थित नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ते, वीज, पाणी या मूलभूत सुविधा आताचे राजकारणी देऊ शकत नाहीत. त्यामुळे बदल आवश्यक आहे, अशी मते बहुतांशी नागरिकांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा