मराठी भाषेत अनेक दर्जेदार चित्रपट निर्माण होतात, पण त्यांना हक्काचे चित्रपटगृह मिळत नाही. त्यामुळे चांगले चित्रपट तयार होऊनही ते प्रेक्षकांपर्यंत पोहचत नाहीत, अशी खंत व्यक्त करून मराठी चित्रपटांना चांगले दिवस येण्यासाठी शासनाने कायदा करणे आवश्यक असल्याचे प्रख्यात अभिनेते सयाजी शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले.
‘पैशाचा पाऊस’ या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यातील चित्रीकरणासाठी ते आले असून या चित्रपटात ते प्रमुख भूमिका साकारत आहेत. ‘पैशाचा पाऊस’ हा चित्रपट अंधश्रद्धेवर प्रहार करणारा असून नेमकेपणाने चांगला विषय मांडण्यात आला आहे. चित्रपटात नवीन कलाकार असले तरी त्यांनी चांगल्या पद्धतीने अभिनय केला आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला नक्कीच उतरेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.
मराठी चित्रपटांविषयी बोलतांना त्यांनी मराठीत नावीन्यपूर्ण विषयांचे चित्रपट निर्माण होतात पण अन्य भाषक चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपट पंधरापटीने मागे आहेत. मराठी चित्रपट दर्जेदार असले तरी चित्रपटगृह मिळत नसल्याने ते प्रेक्षकांपर्यंत पोचत नाहीत. मराठी चित्रपटांना दुय्यम स्थान दिले जात आहे. त्यामुळे मराठी चित्रपटांना चांगले दिवस येण्यासाठी अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्र शासनाने मराठी चित्रपट लावण्यासाठी चित्रपटगृहावर सक्ती करणे आवश्यक आहे. असा कायदा झाला तर मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळतील, असा विश्वास व्यक्त करुन त्यांनी मराठी चित्रपटांना अनुदान देण्याचा प्रकार म्हणजे चित्रपटाला लंगडे करण्याचा प्रकार आहे. त्यामुळे शासनाने अनुदान देण्यापेक्षा मराठी चित्रपटांना सक्तीने चित्रपटगृह उपलब्ध करून देणे हिताचे असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी चित्रपटाचे निर्माते संजय तेलनाडे, शैलेश पाटील, रसुल जमादार आदी उपस्थित होते.