पं.स.च्या पदाधिकाऱ्यांचा प्रताप; शेतकऱ्यांची आर्थिक लूट
गतवर्षी पडलेला दुष्काळ, तर यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिप पिकांचे झालेले नुकसान, गगनाला भिडलेली महागाई, खते व बियाणाच्या वाढलेल्या किमती यासह इतर संकटा७चा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आता काही पक्षीय पदाधिकारी पंचायत समितीच्या नावाखाली मोटार पंप, पाईप यासारख्या बनावट कृषी साहित्याची विक्री करून आपली तुंबडी भरत आहेत.
 ज्या शेतकऱ्यांनी पदाधिकाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पंपाची खरेदी केली ते पंप दोनच दिवसात जळाल्याने शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या भुलथापांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. सुमित सरदार यांनी केले आहे. यावर्षी खरिपाची तूट रब्बीत भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी केली आहे. त्यामुळे हीच संधी साधून चिखली तालुक्यातील काही पक्षीय पदाधिकारी व पंचायत समितीचे काही पदाधिकारी बनावट मोटार पंप व पाईपची सर्रास विक्री करून शेतकऱ्यांच्या खिशावर दिवसाढवळ्या डल्ला मारीत आहेत.
 बाजारात १५ ते २० हजार रुपयात मिळणारे मोटार पंप शेतकऱ्यांना १० ते ११ हजार रुपयात विकण्यात येत आहेत. पदाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून चिखली तालुक्यतील केळवद, सावरगाव, सातगाव, सोनेवाडी, गोद्री, पळसखेड, चांधई यासह इतर गावातील शेतकऱ्यांनी मोटार पंपाची खरेदी केली आहे, परंतु दोन दिवसात ते जळून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना कपाळावर हात मारण्याची पाळी आली आहे. याबाबत अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्य अ‍ॅड. सुमित सरदार यांच्याकडे तक्रारी केल्या. त्यावर त्यांनी गटविकास अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अशा कुठल्याच प्रकारचे साहित्य शासनाकडून वाटप करण्यात आले नसल्याचे त्यांनी सांगितले. एवढय़ावरच न थांबता गेल्या काही दिवसांपासून या पदाधिकाऱ्यांनी स्प्रिंकलरचे पाईप विकण्याचा सपाटा लावला आहे. हे पाईप फक्त ३०० रुपयात देण्यात येत आहेत. वास्तविक, बाजार भावाप्रमाणे या पाईपची किंमत ६०० ते ७५० रुपये आहे. त्यामुळे हे बोगस पाईप वर्षभरातच खराब होणार आहेत. तसेच फवारणी पंप फक्त २४०० रुपयात देण्याचे शेतकऱ्यांना आमिष देण्यात येत आहे. या माध्यमातून काही पदाधिकाऱ्यांनी पैसेही जमा
केले आहेत.

Story img Loader