दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळावा व शासनाने दुष्काळासंबंधी ठोस निर्णय घ्यावेत, यासाठी उमरगा तालुक्यातील कवठा येथे मंगळवारी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व निवृत्त लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिषद होणार असल्याची माहिती भारत विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायकराव पाटील यांनी दिली.
दुष्काळामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असून त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. यातून सकारात्मक मार्ग कसा काढता येईल, यासाठी दुष्काळ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावातील अधिग्रहण केलेल्या विहिरी व विंधन विहिरीस दरमहा २५ हजार रुपये द्यावेत, पाण्याचे गावनिहाय नियोजन केले जावे, जनावरांचा चारा प्रत्येक गावात उपलब्ध केला जावा, ३०० जनावरांचा गट जिथे आहे, तिथे स्वतंत्र छावणी द्यावी, रोजगार हमीच्या कामाचे निकष बदलावेत, शेतकऱ्यांना दरहेक्टरी १० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, पीक कर्ज व वीजबिल माफ करावे, आदी मागण्या या परिषदेत करण्यात येणार आहेत. या परिषदेसाठी राज्यातील ७० टंचाईग्रस्त तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सभापती, सदस्य व प्रतिनिधींना निमंत्रण देण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dushkal parishad with presance of anna hazare