ग्रामपंचायती अधिकाअधिक सक्षम करण्यावर भर दिला जात असून त्याचाच एक भाग म्हणून ग्रामस्थांच्या सोईसाठी येत्या मार्चअखेर राज्यातील १० हजार १५८  गावात ई-बँकींगची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. ई-बँकींग सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहेत, असे प्रतिपादन ग्राम विकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्ह्य़ातील पारशिवनी पंचायत समितीच्या १ कोटी ७८ लाख खर्चाच्या नवीन इमारतीचे तसेच कामठी पंचायत समितीच्या १ कोटी ७३ लाख खर्चाच्या नवीन इमारतीचे उदघाटन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. नव्याने बांधण्यात आलेल्या सुसज्य इमारतीतून सर्व सामान्य लोकांची कामे तनमयतेने व्हावीत, या इमारतीत स्वच्छतेला व पारदर्शक कामाला प्राधन्य दिले जावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
ग्रामपंचायतींना जादा अधिकार देण्याचा शासनाचा निर्णय असून भविष्यात १९ प्रकारची प्रमाणपत्रे जन्ममृत्यूच्या नोंदी, जमाखर्च, गावठाणातील बांधकामास परवानगी या सारख्या सुविधा गांवकऱ्यांना गावातच ग्रामपंचायत कार्यालयात उपलब्ध होतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्लास्टीक वापरामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. मोठय़ा ग्रामपंचायतीत कचरा निर्मूलन आणि अनधिकृत बांधकामे रोखण्यावर भर देण्यात यावा, पावसामुळे खराब झालेल्या जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा तसेच अग्नीशमन गाडी मिळावी, अशी मागणी पारशिवनी येथील कार्यक्रमात बोलताना आमदार अ‍ॅड. आशिष जयस्वाल यांनी केली. कामठी येथील कार्यक्रमात आमदार चंद्रशेखर बावणकुळे यांनी सन २०११च्या जणगणनेनुसार शासकीय योजना राबवाव्यात तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करावी, अशी मागणी केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गोतमारे यांनी कामठी येथील कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समितीतील रिक्तपदे तातडीने भरावीत, नव्याने उभारण्यात आलेल्या इमारतीतील कार्यालयांना फíनचरसाठी निधी उपलब्ध व्हावा, अशी मागणी केली.
जिल्ह्य़ात १३ पंचायत समिती असून १० पंचायत समित्यांना सुसज्ज इमारती उपलब्ध झाल्या आहेत. येथे काम करणारया कर्मचाऱ्यांनी सर्व सामान्य जनतेच्या अडचणी समजावून घेऊन त्या सोडविण्यावर भर द्यावा. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळावी त्यांची कामे गतीने पूर्ण व्हावी, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी सांगितले.
समारंभास जिल्हा परिषदेच्या सभापती वंदना पाल, वर्षां धोपटे, दुर्गावती सारियाम, नंदा लोहबरे, जिल्हा परिषद सदस्य शरद डोणेकर, माया कुसुंबे, ज्ञानेश्वर कंभाले, सरिता रंगारी, कुंदा आमधरे, विनोद पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी., पारशिवनीच्या सभापती करुणा आष्टणकर, उपसभापती शेषराव हुड, कामठीच्या सभापती संगीता तांबे, उपसभापती विमल साबळे, गटविकास अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, सरपंच, नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.