मराठी माणसाच्या संस्कृतीचे संचित असलेले साहित्य दिवाळी अंकांच्या रूपाने कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची सोय ई-दिवाळी अंकांमुळे झाली आहे. नियतकालिक हाती घेऊन वाचण्याऐवजी संगणकाच्या स्क्रीनवर दिवाळी अंक वाचता येणे, अशा सोप्या शब्दात ई-दिवाळी अंकांची व्याख्या करता येईल. दिवाळीच्या दरम्यानचा काळ वगळता ९० टक्के दिवाळी अंक स्टॉलवर विक्रीसाठी उपलब्ध नसतात. त्या त्या भागातील प्रसिद्ध वाचनालयात काही मासिके-नियतकालिके येतात आणि टपालाने वर्गणीदारांकडे नियतकालिके येतात. मात्र दिवाळी अंकांचे दिवाळीच्या दिवसात हजारोंच्या संख्येने येणारे पीक हा सर्वासाठीच आश्चर्याचा विषय असतो. साहित्य विषयक, विनोदी, आध्यात्मिक, आरोग्य, ज्योतिष, सांस्कृतिक, उद्योग, व्यापार, खास महिलांसाठी अशा विविध विषयांवर हे दिवाळी अंक असतात. दिवाळी अंकांचे केंद्र खऱ्या अर्थाने पुण्या-मुंबईचे. नागपुरातील दिवाळी अंक आणि तेही ई-दिवाळी अंक बोटावर मोजावीत एवढीच आहेत. पिढय़ान्पिढय़ा सुरू असलेले ‘मुलांचे मासिक’ आणि याचवर्षीपासून ई-दिवाळी अंकांच्या शर्यतीत आलेला आकांक्षाचा दिवाळी अंक सांगता येतील.
‘अक्षरगंध’ हे शब्द रत्न प्रकाशनने प्रकाशित केलेला १२० रुपयांचा दिवाळी अंकाची ई-किंमत ९६ रुपये आहे. अमृतघट दिवाळी अंक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या ‘अमृतघट’ दिवाळी अंकाची किंमत ८० रुपये आहे. याशिवाय ज्योतिष विषयाला वाहिलेला ‘भाग्यदीप’, एकता प्रकाशनचा तथागत गौतम बुद्ध आणि स्वामी विवेकानंद यांच्या शतकोत्तर जयंतीनिमित्त ‘एकता’, नवीन प्रकाशनचा ‘ग्रहसंकेत’, युनिक फिचर्सचा ‘जगावेगळी मुशाफिरी’ व ‘महाअनुभव’, मेनका प्रकाशनचा ‘जत्रा’, महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तके मंडळाचा ‘किशोर’, कुमार प्रकाशनचा ‘कुमार’, मेनका प्रकाशनचा ‘माहेर’, ‘मुक्त शब्द’, ‘पासवर्ड’, ‘पुण्यभूषण’, ‘रणांगण’, ‘साहित्य चपराक’, ‘श्री व सौ’ आणि ‘वेदान्तश्री’ अशी ही वेगवेगळी दिवाळी अंक ऑनलाईन वाचने सहज शक्य आहेत. किशोर या ई-दिवाळी अंकाच्या ४५ रुपये किमतीपासून ते १५० रुपये किमतीची नियतकालिके उपलब्ध आहेत.
ई-दिवाळी अंक काही प्रकाशन नि:शुल्क उपलब्ध करतात तर बऱ्याच अंकांसाठी शुल्क अदा करावे लागते. कारण ऑनलाईन दिवाळी अंक नि:शुल्क केला तर दिवाळी अंकाच्या खपावर त्याचा परिणाम होतो. ऑनलाईन सहज उपलब्ध असले तरी स्टॉलवर जाऊन दिवाळी अंक खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाहीच.
स्टॉलवर या दिवसात सर्वच दिवाळी अंक विकत मिळतात आणि दिवाळीच्या दिवसात अंक वाचन्याची एक वेगळीच ऊर्जा असते. त्यामुळे ऑनलाईनच्या प्रेमात न पडता हातात दिवाळी अंक तासन्तास धरून वाचणेच बरे असेही वाचकांचे म्हणणे आहे. विदर्भात अक्षरवैदर्भी, आकांक्षा, मुलांचे मासिक, साहित्य विहार, केशव प्रकाश सारखे दिवाळी अंक प्रकाशित होतात. त्यापैकी येत्या १३
नोव्हेंबरपासून आकांक्षाचा ई-दिवाळीअंक सर्वासाठी खुला राहील.