लातूर महापालिकेने ई-गव्हर्नन्स प्रक्रिया सुरू केली. ई निविदा पद्धत प्रथमच सुरू झाली. जनतेला विविध कर भरण्यास महापालिकेत चकरा माराव्या लागू नयेत, या साठी पुढच्या टप्प्यात कर भरणा करण्यासाठीही ऑनलाइन सुविधा उपलब्ध करणार असल्याचे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले.
शहरातील कचऱ्याचा प्रश्न सर्वाचीच डोकेदुखी झाला आहे. गेल्या आठ-दहा वर्षांपासून कचरा डेपोवर साठलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यास निविदा मागविल्या आहेत. कचऱ्यामुळे पसरणारी दरुगधी कमी करण्यासाठीही निविदा मागविल्या आहेत. याबरोबरच शहरात प्रायोगिक तत्त्वावर हरितपट्टय़ात बायोगॅस निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. त्याच्याही निविदा मागवण्यात आल्या.
शहरात गेल्या ८ दिवसांपासून अतिक्रमण हटाव मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत सम्राट चौक, गांधी चौक, नांदेड नाका, विवेकानंद चौक या मार्गावरील १९७ अतिक्रमणे काढण्यात आली. नव्याने अतिक्रमण करण्याचे धाडस कोणी केल्यास संबंधिताचा माल कायमस्वरूपी जप्त करण्यात येईल, असे तेलंग यांनी स्पष्ट केले.
मोकाट जनावरे पकडून कोंडवाडय़ात ठेवण्याची मोहीमही पालिकेने सुरू केली. मात्र, पालिकेकडे जनावरे ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने लातूर बाजार समितीकडून नवी जागाही उपलब्ध केली आहे. मोकाट जनावरांच्या मालकांना जनावरामागे एक हजार रुपये दंड, शिवाय दरदिवशी चारा-पाण्याचा खर्च १६० रुपये वसूल केला जात आहे. औसा पालिकेप्रमाणे मोकाट जनावरांचा लिलाव करण्याची मोहीमही लवकरच हाती घेतली जाणार असल्याचे तेलंग यांनी स्पष्ट केले.