शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) विद्यार्थी आणि शिक्षकांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी राज्य सरकारने ई-ग्रंथालय सुरू करण्याला मंजुरी दिली. यासाठी राज्य सरकारने चार कोटी रुपये दिले. ई-ग्रंथालयाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे. परंतु हे ई-ग्रंथालय अद्यापही सुरू झाले नसल्याने त्याचा फायदा विद्यार्थी आणि शिक्षक घेऊ शकत नाही.
मेडिकलच्या हीरक महोत्सवानिमित्त २००६ मध्ये आयोजित समारंभात तत्कालीन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुनील देशमुख यांनी ई-ग्रंथालय सुरू करण्याची घोषणा केली होती. दोन वर्षांनंतर १० ऑक्टोबर २००८ रोजी राज्य सरकारने ४ कोटी २० लाख रुपये मंजूर केले. यानंतर रुग्णालय परिसरात २ हजार ७९९ वर्गमीटर परिसरात ई-ग्रंथालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले. ज्या वेगाने हे बांधकाम सुरू व्हावयास हवे होते, त्या वेगाने झाले नाही. त्यातच २०११ मध्ये या इमारतीच्या बांधकामाचे क्षेत्रफळ २ हजार ७९९ वर्गमीटरवरून ४ हजार १०६ वर्गमीटर वाढवण्यात आले. क्षेत्रफळ वाढवण्यात आल्याने खर्चही वाढला. त्यामुळे अतिरिक्त निधी वाढवण्याचा प्रस्ताव मेडिकलच्या प्रशासनाने शासनाला पाठवला.
अनेक अडचणींवर मात करून ई-ग्रंथालय इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ई-ग्रंथालय लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी विद्यार्थी व शिक्षक करीत आहेत. ही मागणी पुढे आली असतानाच हे ग्रंथालय डिजिटल करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यामुळे हे ग्रंथालय लवकर सुरू होईल, अशी चिन्हे सध्यातरी दिसत नाहीत.