‘ही पोस्ट कुणाची आहे. ही व्यक्ती माझ्या फेसबुकवर प्रेमाचे संदेश शेअर करत असते.’
‘तुझ्या ओळखीची आहे का?’
‘नाही.’
‘मग त्याला अनफ्रेंड कर.’
‘केले दोनदा पण तो वेगळय़ा नावाने माझ्या मित्रांच्या फ्रेंडलिस्टमधून माझ्यापर्यंत पोहचतोच.’
‘बघ त्याला एकदा दम दे. नाही तर थेट पोलिसांत तक्रार कर.’
दोन मैत्रिणींमधील हा संवाद मुलींसाठी तरी काही नवा नसेल. बहुतांश मुलींनी एकदातरी कुणी अनोळखी व्यक्ती आपल्याशी फेसबुक किंवा ई-मेलच्या माध्यमतून संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचा अनुभव घेतला असेलच. हा अनुभव वेळीच थांबला तर ठीक अन्यथा याचा मनस्ताप होऊन तो एक प्रकारचा मानसिक छळ होऊ शकतो. हा छळ करणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. एखाद्याला कुणाला छळायचे असेल तर ते वेगवेगळय़ा मार्गाचा अवलंब करत असतात. यापूर्वी फोन आणि एसएमएस अशा स्वरूपातून होणारे छळ आता ई-मेल, फेसबुक, ट्विटर अशा विविध सोशल मीडियामधून होऊ लागले आहेत. यामुळे सोशल मीडियावरील आपला वावर किती असावा यावरही मुलींवर बंधने येऊ लागली आहेत.
ऑफिसमधील एखादी व्यक्ती किंवा बॉस फेसबुकच्या माध्यमातून मुलींना अनेक प्रेमाच्या गोष्टी शेअर करत असतो. निव्वळ साधा संदेश म्हणून शेअर केलेल्या या पोस्टवर त्याला मुलीची कमेंट अपेक्षित असते. ही कमेंट आली नाही की तिला मेसेज लिहून सारखे कळविले जाते. तरीही काही प्रतिसाद आला नाही तर तिच्या टाइमलाइनवरील संदेशांची संख्या वाढत जाते. अशावेळी ती मुलगी त्या व्यक्तीबद्दल फेसबुकवर कोणत्याही प्रकारे वाईट लिहू शकत नाही किंवा ‘अनफ्रेंड’ही करू शकत नाही. तसे केले तर ऑफिसमध्ये होणाऱ्या नको त्या चर्चाना सामोरे जावे लागते. हे सर्व टाळण्यासाठी अनेकदा मुली दुर्लक्ष करत असतात. मात्र असे प्रकार सातत्याने वाढू लागले असून यामध्ये मुली चांगल्याच भरडल्या जात आहेत. यासंदर्भात कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या मुलींच्या समस्यांवर प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालामध्ये या मुलींचा सर्वाधिक मानसिक छळ होत असल्याचे समोर आले आहे. बॉसने कामावरून मुलींना छळणे आणि वैयक्तिक हेतू ठेवून छळणे या दोन्हीमध्ये फरक असून वैयक्तिक छळासाठी सध्या ई-मेल आणि फेसबुकचा वापर केला जाऊ लागला आहे. ‘अमूक एखादी गोष्ट कर,’ ‘माझ्याबरोबर कॉफी प्यायला ये, नाही तर गप्पांमधून शेअर झालेले अनेक गुप्त किस्से थेट फेसबुकच्या टाइमलाइनवर शेअर करेन’ अशाप्रकारच्या धमक्या देण्याचे प्रकार कॉर्पोरेट्समध्ये सर्रास घडत आहेत. अनेक छोटय़ा गोष्टींची तक्रार करून त्याबाबत रडत बसण्यापेक्षा याकडे दुर्लक्ष करणे मुली पसंत करत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुलींच्या छळामध्ये आता ऑनलाइन छळाची भर पडल्याने त्यांना अधिकच कठीण जाऊ लागले आहे.
लैंगिक छळाचा ई-मार्ग
'ही पोस्ट कुणाची आहे. ही व्यक्ती माझ्या फेसबुकवर प्रेमाचे संदेश शेअर करत असते.' 'तुझ्या ओळखीची आहे का?'
First published on: 30-11-2013 at 07:08 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: E way of sexual harassment