मनसेच्यावतीने कर्णबधीर विद्यार्थी व नागरिकांना कर्णयंत्र वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन गुरूवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मीला ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी आ. वसंत गिते, आ. नितीन भोसले, महापौर अ‍ॅड. यतीन वाघ, प्रदेश सरचिटणीस अतुल चांडक, जिल्हाध्यक्ष सचिन ठाकरे आदी उपस्थित होते. या उपक्रमांतर्गत १४८६ जणांना या यंत्राचे वितरण केले जाणार आहे. या कार्यक्रमातही राज यांची नाराजी लपून राहिली नाही. यावेळी त्यांनी जाहीरपणे बोलणे टाळले.
वर्धापनदिनानिमित्त मनसेच्या शहर व जिल्हा शाखेच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी तीन हजारहून अधिक कर्णबधीर विद्यार्थी व नागरिकांचीही तपासणी करण्यात आली होती. त्यातील ज्या गरजुंना कर्णयंत्राची आवश्यकता आहे, त्यांना ही यंत्र पुरविण्याचा प्रयत्न मनसेकडून करण्यात येणार आहे. कर्णयंत्र वितरणाच्या या कार्यक्रमाचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात काही जणांना कर्णयंत्र वाटप करण्यात आली. डॉक्टरांकडून लगेचच ही कर्णयंत्र संबंधितांना बसविण्यात आली. त्याचे अवलोकन राज व त्यांची पत्नी शर्मिला यांनी केले. दरम्यान, उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघालेल्या राज यांनी दोन दिवस नाशिकमध्ये मुक्काम ठोकला. या काळात पहिल्या दिवशी त्यांनी शहर विकासाशी संबंधित प्रश्नांचा पालिका आयुक्त, महापौर यांच्याशी चर्चा करून आढावा घेतला. पालिकेतील मित्रपक्ष असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन मध्यंतरी निर्माण झालेला दूरावा कमी करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरूवारी त्यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जाहीरपणे वक्तव्य करण्याचे टाळले.
याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार राज हे गुरूवारी धुळ्याला जाणार आहेत. तत्पुर्वी, त्यांनी पक्षीय कार्यक्रमात उपस्थिती लावून नंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. महापालिकेत सत्ता येऊनही वर्षभरात मनसे प्रभावीपणे काम करू शकली नसल्याची ओरड विरोधकांकडून सुरू आहे. या मुद्यावरून प्रसारमाध्यमांकडूनही लक्ष्य केले जात असल्याने वैतागलेल्या राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली. विकासकामे मूर्त स्वरूपात दिसण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा करावी, असे त्यांचा बोलण्याचा सूर होता. उत्तर महाराष्ट्रात मनसेची पाळेमुळे रोवण्याच्या दृष्टीकोनातून त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत आपल्या करिष्म्याचा शक्य त्या भागात ठसा उमटविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Story img Loader