अंगाची काहिली करणारा उन्हाळा, घशाला पडलेली कोरड आणि समोर दिसणारी रसरशीत फळांच्या फोडींची डिश, हे चित्र सध्या सर्वत्र दिसते आहे. कोरडा पडलेला घसा जरा ओला व्हावा म्हणून तुम्ही या फळांच्या फोडी खात असाल तर जरा जपून.. असा सल्ला वैद्यकीय व्यावसायिक आणि आहारतज्ज्ञ देत आहेत.
उघडय़ावर ठेवलेल्या या फोडी खाल्ल्या तर नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे उघडय़ावरील फळांच्या फोडी खाण्यापेक्षा आपल्याला आवडणारी फळे घरी आणून आणि ती स्वच्छ धुवून खावीत. अगदीच वाटले तर या फळांच्या फोडी कार्यालयात किंवा बाहेर पडताना आपल्याजवळ जेवणाच्या डब्याबरोबरच ठेवाव्यात, असा एक पर्याय डॉक्टर देत आहेत.
रस्ते आणि पदपथावर ‘फ्रूट डिश’चे जे स्टॉल असतात त्यावरील फळांच्या फोडी या बहुतेक वेळा लोखंडी सुरीने केल्या जातात. लोखंडी पात्याचा वापर केल्याने ही फळे काळी तर पडतातच; पण ती बराच वेळ उघडय़ावर असल्याने त्यातील क जीवनसत्वही नष्ट होते. तसेच त्यावर हवेतील धूळ, कचरा आणि सुक्ष्म जीवजंतू बसतात. या सुक्ष्म जीवजंतूंची वाढही झपाटय़ाने होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणतेही फळ कापल्यानंतर ताबडतोब खाल्ले तरच त्यातील जीवनसत्वाचा शरीराला लाभ होतो. या फळांच्या फोडी बराच वेळ कापून ठेवल्याने त्या आरोग्यासाठीही हितकारक राहात नाहीत, असे आहारतज्ज्ञ विनिता तारे-गोलतकर यांनी सांगितले.
रस्ते आणि पदपथावर सध्या कलिंगड, संत्रे, मोसंबी, पपई, अननस, टरबूज, सफरचंद आदी विविध फळांच्या फोडी ठेवलेल्या डिशची मोठय़ा प्रमाणात विक्री होत आहे. अनेकदा गटारे, कचराकुंडय़ा याच्या बाजूला फळविक्रेत्यांचे स्टॉल्स असतात. उघडय़ावर ठेवलेल्या या फळांच्या डिशवर अनेकदा माशाही घोंगावत असतात. मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करून या फळांच्या फोडी खाल्याने घशाला खवखव, खोकला, घशाला सूज येणे या बरोबरच पोट बिघडणे, कावीळ असे आजारही होण्याची शक्यता असल्याचे वैद्यकीय व्यावसायिकांकडून सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा