पारंपरिक सण आणि उत्सवांमधील बाजारीकरणाचे प्रमाण वाढले असून या बाजारीकरणाविरोधात आवाज उठवत पारंपरिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा उपक्रम कल्याणच्या सुभेदारवाडा गणेशोत्सव मंडळाने यंदा राबवला आहे. गणेशोत्सवाचा देखावा, निमंत्रण पत्रिका, स्मरणिका, मनोरंजनात्मक कार्यक्रम या सर्वावर या पर्यावरणस्नेही उपक्रमाची छाप असून मंडळाच्या वतीने गणेश दर्शनासाठी येणाऱ्या सर्व गणेशभक्तांना पर्यावरण जागृतीचे स्टिकर्स देऊन पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.
कल्याणमध्ये १८९५ मध्ये लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने सुभेदारवाडा सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात झाली. १९०६ मध्ये टिळकांनी या गणेशोत्सव मंडळास भेट देऊन या मंडळाच्या जनजागृती उपक्रमांना आपला पाठिंबा दर्शविला होता. १२० व्या वर्षांमध्ये पदार्पण करत असलेल्या या उत्सवाने पर्यावरणावरील मानवी आक्रमणाचे चित्र आपल्या देखाव्यातून मांडले आहे.
यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रिद्धी-सिद्धी या महिलांच्या मंडळाने घेतली आहे तर देखाव्याची संकल्पना साकारण्याचे काम राम जोशी यांनी केली आहे. पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे पर्यावरणाचा ढासळलेला समतोल, दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने आवाजाच्या प्रदूषणाचा निर्माण झालेला वाद, उत्साहातील धांगडधिंगाणा, सणांचे बाजारीकरण या सर्व अपप्रवृत्तीला विरोध करणारा आणि पर्यावरण जागृती करणारा देखावा सुभेदारवाडय़ाने साकारला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा