धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक चर्चा केल्या म्हणजे भाषा टिकतात हा गैरसमज आहे. साहित्य संमेलनांमध्ये भाषा या विषयावर परिसंवाद झडतात. प्रत्यक्षात अशा परिसंवादातून फारसे काहीही साध्य होत नाही. भाषा जगविण्यासाठी आणि भाषेचे वैभव फुलविण्यासाठी त्याला अर्थव्यवस्थेचे भक्कम पाठबळ असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी रविवारी येथे केले.
डोंबिवली ग्रंथसंग्रहालयातर्फे ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमाअंतर्गत प्रसिद्ध गणितज्ज्ञ तसेच मराठी भाषा संशोधक डॉ. सदाशिव देव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम तसेच त्यांनी लिहिलेल्या ‘ज्ञानभाषा मराठी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष आबासाहेब पटवारी, पितांबरीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई, पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे उपस्थित होते.
साम्राज्यशाहीत भाषांना भक्कम आर्थिक पाठबळ होते. त्यामुळे त्यांच्या भाषा टिकल्या. साम्राज्ये लयाला गेल्यावर त्यांच्या भाषाही मृतप्राय झाल्या. आपली अर्थव्यवस्था सक्षम आहे. त्यामुळे भाषा जगविण्याचा विचार प्राधान्याने झाला पाहिजे; अन्यथा या भाषाही लयाला जातील, अशी भीती गिरीश कुबेर यांनी व्यक्त केली. बाजारपेठा विस्तारतात त्याप्रमाणे भाषांचाही विकास होत असतो. प्रत्येकाने आपल्या परीने नवीन शब्द पेरण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होतो असेही ते         म्हणाले.
लेखक डॉ. देव यांच्याशी प्रा.संध्या टेंबे यांनी संवाद साधला. यावेळी डॉ. देव म्हणाले, जगातील कोणत्याही भाषेच्या निर्मितीचे प्रमेय एकच आहे. भाषा माणसाने निर्माण केल्या आहेत. भाषेला जीवशास्त्रीय संपर्क असतो. भाषेवर सरकारचे कोणतेही बंधन नसते. आत्मप्रकटीकरणासाठी भाषेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे या भाषांचा विस्तार झाला पाहिजे. विदेशात मातृभाषांना मातेचा दर्जा आहे. भारतात मात्र मातृभाषेचा अनादर केला जातो. युरोपातील ४२ ज्ञानभाषांपैकी २८ राजभाषा असल्याचे ते म्हणाले. गणित व भाषा या समाजाला देणग्या आहेत. भाषेच्या अभ्यासातून नवीन विषयांची निर्मिती होते. संशोधनामध्ये भाषांचे वैभव दडलेले असते. अमेरिकेत अशा प्रकारचे संशोधन होऊन ते आपल्याकडे अर्थकारणातून विकले जाते. त्या बळावरच अमेरिका आपली श्रीमंती टिकवून आहे. भारतात मात्र अशा प्रकारचे मूलभूत संशोधन होत नाही. भारताच्या वैभवाच्या कोणी कितीही गप्पा मारल्या तरी जोपर्यंत आपण संशोधनाला महत्त्व देत नाहीत, तोपर्यंत भाषेचे व भारताचे वैभव कदापि प्रत्यक्ष कृतीत उतरणार नाही, अशी भीती डॉ. देव यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पटवारी यांनी केले. जाखडे, प्रभुदेसाई यांनीही मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा. संध्या टेंबे यांनी केले.

Story img Loader