बालकामगारांविषयी अनेक कायदे करण्यात आले असले तरी आज समाजामध्ये आर्थिक परिस्थितीने दुर्बल असलेल्या अनेक गोरगरीब कुटुंबातील १७ वर्षांखालील मुले मिळेल ती कामे करण्यासाठी तयार असतात. अशा मुलांची संख्या ४० टक्के आहे. समाजामध्ये या बालकांविषयी किती अनास्था आहे हे शहरातील विविध भागातील कारखाने, छोटे उद्योग आणि रस्त्यावर भटकणाऱ्या बालकांवरून दिसून येते.
पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस उद्या देशभर बालकदिन म्हणून साजरा केला जाणार आहे. बालक दिनाच्या निमित्ताने शहरातील विविध भागात कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विदर्भात परिस्थितीने अतिशय दुर्बल असलेल्या १७ वर्षांखालील ४० टक्के मुलांचे काय? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून अनुत्तरीत आहे. शाळाबाह्य़ मुले, आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या कुटुंबातील मुले पोटाची खळगी भरण्यासाठी बाल कामगार म्हणून काम करताना दिसतात. वर्षभर या मुलांकडे कुणाचेही लक्ष नसते; परंतु बालदिन आला की मुलांच्या भवितव्याचा प्रश्न प्रश्न ऐरणीवर येतो.
विविध जिल्ह्य़ात बाल कामगारांची संख्या ४० टक्के आहे. बालकामगार ठेवता येत नाही असा कायदा असतानाही विदर्भातील विविध बाजारपेठेतील बहुतेक दुकानात, चहाच्या टपरीवर, हॉटेल्स, रेल्वे, बस स्थानकांवर, विटभट्टी किंवा कारखान्यांमध्ये कमी पैशांमध्ये काम करणारी मुले दिसून येतात. याकडे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. रस्त्यावर बेवारसपणे फिरणाऱ्या मुलांसाठी किंवा झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांबाबत आज काही सामाजिक संघटना काम करीत असल्या तरी चोवीस तास संघटनेचे कार्यकर्ते मुलांच्या मागे राहणे शक्य नाही, त्यामुळे पालक आर्थिक परिस्थितीमुळे मुलाला झेपेल अशी कामे करण्यासाठी पाठवित आहेत.
शहर व ग्रामीण भागातील दुकांनामध्ये किंवा चहाच्या टपरीवर, बाल कामगार दिसून येतात. शिवाय शेतात काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शाळेला दांडी मारून मुले शेतात काम करीत असल्याचे दिसून येते. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे अनेक आईवडील मुलांना कामावर घेऊन जात असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येते. बालदिनाच्या निमित्ताने देशभर पंडित नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. त्यात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते बाल कामगारांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे आश्वासन देतील, पण जी मुले पोटाची खळगी भरण्यासाठी कामगार झाली त्यांच्या भविष्याची हमी कोण घेणार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आर्थिक परिस्थितीने गांजलेल्या कुटुंबातील मुलांना शिक्षण मिळत नाही. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. विविध आदिवासी आणि गोरगरीब कुटुंबामध्ये शैक्षणिक वातावरण नसल्याने या समाजाची मुले मिळेल ती काम करीत आहेत. लहान मुलांच्या बाबतीत काही सामाजिक संघटना काम करीत असल्या तरी समाजामध्ये जनजागरण मोहीम राबविण्याची गरज आहे. बालकांच्या भविष्यातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्व संस्था, संघटनांना यामध्ये यश आल्यास बालक दिन साजरा होईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा