महाराष्ट्रसह देशात होणा-या विक्रमी ऊस उत्पादनाचा विचार करता, केवळ साखर उत्पादन न करता, कच्ची साखर व इथेनॉल निर्माण झाले पाहिजे. इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळून पेट्रोलची आयात कमी करता येणार असल्याने साखर उद्योगातील मंडळींनी याचा विचार करताना, यापुढे उद्योग म्हणूनच साखर उद्योगाकडे पहावे, तर एकंदर साखर उद्योगाचा विचार करून राज्यातील शेतकऱ्यांनी साखरेबाबतचे अर्थकारण समजून घ्यावे, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले.
इस्लामपूर येथे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त राजारामबापूंच्या दुर्मिळ छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व त्यांच्या सहका-यांचा सत्कार अशा कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून ते बोलत होते. सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी मंत्री अण्णा डांगे, माजी खासदार निवेदिता माने, आमदार विलासराव पाटील-उंडाळकर, संजयकाका पाटील, मानसिंगराव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील, सारंग पाटील, देवराज पाटील, अरूण लाड उपस्थित होते.
पवार म्हणाले, की सध्या देशात होणा-या अतिरिक्त ऊसउत्पादनामुळे साखरेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशांतर्गत पुरेशी साखर शिल्लक राखून साखर निर्यातीचा विचार केला तर, परदेशातही साखरेचे दर पडले आहेत. ३ हजार २०० प्रति क्विंटल असणारी साखर २ हजार ३०० रुपयांवर येऊन पोहोचली आहे. अशावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर देणे अवघड होऊन बसले आहे. या बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कृषिमंत्री म्हणून, माझ्या नेतृत्वाखालील समितीने ४० लाख टन साखर निर्यातीची शिफारस केली आहे. उसावरचा कर कमी करून शेतकऱ्यांच्या दरात ३०० रुपये दर वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारने ६ हजार ५०० कोटी रुपये साखर कारखान्यांना सवलतीच्या दराचे कर्ज उपलब्ध करून दिले आहे. त्याचबरोबर साखर निर्यातीसाठी जे नुकसान होणार आहे, ते केंद्र सरकार सोसणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
लोकनेते राजारामबापू पाटील हे दूरदृष्टी असणारे आणि कार्यकर्त्यांचे मोहोळ जपणारे नेते होते. यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या छायेत जे नेते तयार झाले. त्यामध्ये वसंतदादा पाटील, लोकनते राजारामबापू पाटील हे आघाडीचे नेते होत. शेतकरी, कष्टकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणा-या बापूंनी महसूल, वीज, उद्योग ही महत्त्वाची खाती समर्थपणे सांभाळली. राज्याचे आणि सर्वसामान्य माणसाचे हित नजरेसमोर ठेवून त्यांनी राजकारण, समाजकारण केले.
जयंत पाटील म्हणाले, की राजारामबापूंनी सर्वसामान्य माणसांना बरोबर घेऊन राजकारण आणि समाजकारण केले. ते सदैव माणसांच्या गराडय़ात राहिले. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी बापूंच्या जीवनाचा मागोवा घेण्याचा लिलया प्रयत्न केला आहे. आज येथे बापूंचे जुन्या काळातील सहकारी रामराव देशमुख, माजी आमदार विश्वासराव पाटील, माजी खासदार विश्वास दाजी पाटील, यांचा त्याचबरोबर या विभागाचे माजी खासदार श्रीनिवास पाटील यांचा सत्कार होतो आहे, ही समाधानाची बाब असल्याचे ते म्हणाले. श्रीनिवास पाटील, मधुकर भावे यांनी मनोगत व्यक्त केले. भारत भेटीवर आलेल्या केनिया देशाचे शिष्टमंडळ या ठिकाणी आले होते त्यामधील गव्हर्नर तुनाई यांचेही यावेळी भाषण झाले. नगराध्यक्षा अरूणादेवी पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. पी. आर. पाटील यांनी आभार मानले. या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे लिखित ‘बापू’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
 

Story img Loader