गाव विकासाला चालना देण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेतील सातव्या वर्षांतील उपक्रम धुळे महानगरपालिका, नगरपालिका तसेच नंदुरबार नगरपालिका निवडणूक आचारसंहितेमुळे काहीसे थंडावले आहेत. गावातील वाद स्थानिक पातळीवर मिटविण्याच्या या योजनेपेक्षा ग्रामस्थांना निवडणुकीचा फड महत्त्वाचा वाटतो. शिवाय, आचारसंहितेमुळे मोहिमेतील उपक्रमांवरही र्निबध आले आहेत.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेची दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी सुरुवात होते. १५ ते ३० ऑगस्ट या कालावधीत ग्रामसभा आयोजित करून ग्रामपंचायतींना मोहिमेत सहभागी होण्याबाबतचा निर्णय घेऊन तंटामुक्त गाव समितीची निवड करावी लागते. त्यानंतर दाखल तंटय़ांची माहिती संकलन करून ती ३० सप्टेंबरपूर्वी नोंदवहीत नोंदवावी लागते. मागील काही वर्षांपासून जेव्हा ही प्रक्रिया करण्याची वेळ येते, तेव्हा ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता लागू होते.
परिणामी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यासाठी स्थापन केल्या जाणाऱ्या तंटामुक्त गाव समितीत ज्या समाजातील प्रभावशाली, प्रतिष्ठित व्यक्तींना सदस्यत्व दिले जाते, त्या मंडळींचे लक्ष स्थानिक राजकारणात अर्थात ग्रामपंचायत निवडणुकांकडे लागल्याने मोहिमेतील सहभाग घसरण्यावर परिणाम झाल्याचे वारंवार निदर्शनास आले. मोहिमेचे सातवे वर्ष मात्र त्यास अपवाद ठरले आहे. कारण उपरोक्त प्रक्रिया झाल्यानंतर यंदा आचारसंहिता लागू झाली आहे.
या मोहिमेंतर्गत गावोगावी राजकीय सामंजस्य निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. त्याकरिता विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, पतसंस्था यांच्या निवडणुका अविरोध करणाऱ्या गावाला अधिकचे पाच गुण प्राप्त करण्याची संधी असते. त्याच धर्तीवर जिल्हा परिषद निवडणुकीत त्याचा आधार घेता येऊ शकतो. अविरोध निवडणूक झाल्यास अनाठायी खर्च टाळला जाऊ शकतो. तसेच गावात शांततेचे वातावरण कायम ठेवण्यास हातभार लागतो. परंतु प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा जबरदस्त असल्याने एखादा अपवाद वगळता अविरोध निवडणूक होईल याची कोणतीही शाश्वती नाही.
सध्या लागू झालेल्या आचारसंहितेमुळे तंटामुक्त गाव समितीच्या कामकाजावर र्निबध आले आहेत. शासनाने वर्षभराच्या कालावधीत तंटामुक्त गाव समितीने काय काम करणे अपेक्षित आहे, त्याचे वेळापत्रक आखून दिले आहे. बहुतांश ग्रामस्थ निवडणुकीत मग्न झाल्यामुळे कामकाजाला आचारसंहिता संपुष्टात आल्यावर चालना मिळू शकेल.
ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान राबविले जात आहे. या मोहिमेचे यंदाचे हे सातवे वर्ष. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या मोहिमेच्या नाशिक विभागातील कामगिरीचा वेध लेख मालिकेद्वारे घेण्यात येत आहे. मालिकेतील हा पहिला लेख.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा