शिक्षण संस्था   आणि   उद्योग   क्षेत्र    यांतील परस्परसंबंध शहराच्या    विकासाच्या    दृष्टीने    आवश्यक असल्याचे मत   मनुष्यबळ    सल्लागार गिरीश टिळक यांनी व्यक्त केले.
येथील मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या डॉ. मुंजे व्यवस्थापन महाविद्यालयात ‘शिक्षण आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचे एकत्रीकरण आणि चर्चा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रास्ताविकात डॉ. अशोक अग्रवाल यांनी नाशिक शहराचा विकासाचा वेग वाढत असताना अशा परस्पर समन्वयाची आवश्यकता व्यक्त केली. कार्यक्रमास मोहन अढांगळे, अमोल इंडस्ट्रीजच्या नलिनी कुलकर्णी, नासा उद्योगाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभदा देसाई, चार्टर्ड अकाऊंटंट प्रमोद दीक्षित, डब्ल्यूएनएसचे मनुष्यबळ समूह व्यवस्थापक अशितोष शर्मा, क्रॉम्प्टन ग्रीव्हज्चे संजय टिभे आदी उपस्थित होते.
व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना सध्या ४५०० व्यवस्थापन महाविद्यालयातील फक्त १० टक्के विद्यार्थी रोजगाराच्या दृष्टीने सक्षम असल्याचे एका सर्वेक्षणाच्या निमित्ताने लक्षात आले आहे. एका बाजूने शिक्षण क्षेत्रात एकूणच गुणवत्तेविषयी चिंताजनक स्थिती असताना परीक्षा पद्धतीत सुधारणा आवश्यक असल्याचे टिळक यांनी सांगितले.
मान्यवरांनी शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्या परस्पर सहकार्याबरोबर, उद्योजकता विकास आणि त्या दृष्टीने संस्था, संघटना आणि उद्योग यांचा परस्पर समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले.
पुढील काळात शिक्षण संस्थांनी स्वत:च्या अभ्यासक्रमात शिक्षण आणि प्रत्यक्ष काम यातील तफावत कमी करत असताना विद्यार्थ्यांचा विकास अधिक चांगला कसा होईल, प्रकल्पात काम करत असताना अधिकाधिक शिकायला मिळण्याची गरज आहे.
अनेक उद्योग क्षेत्र विद्यार्थ्यांकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या वाटणाऱ्या अवास्तव अपेक्षा आणि क्षमता यांत खूपच फरत जाणवत आहे. छोटय़ा उद्योग क्षेत्रात काम करण्याचा व्यवस्थापन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. उद्योग क्षेत्र दर वर्षी काही मुलांचे पालकत्व घेऊ शकतात. प्रथम वर्षांत असताना विद्यार्थ्यांच्या विकासाकडे अधिक काळजीपूर्वक लक्ष देऊन प्राध्यापक आणि विद्यार्थी यांचा संवाद उद्योगाबरोबर अधिक सकारात्मक होण्याची आवश्यकता आहे.
एकूणच प्रयोगशील वातावरणनिर्मिती करण्याची गरज सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. प्रास्ताविक डॉ. मुंजे व्यवस्थापन महाविद्यालयांचे संचालक डॉ. अशोक अग्रवाल यांनी केले. आभार महेश कुलकर्णी यांनी मानले.
समन्वयक म्हणून प्रा. हर्षदा औरंगाबादकर आणि प्लेसमेंट समन्वयक प्रा. दीपाली चांडक यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्रा. संजय साळवे यांनी केले.

Story img Loader