दिल्लीतील सामूहिक बलात्कार तसेच महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता ठाणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने महापालिका शाळांमधील विद्यार्थिनींना सुरक्षिततेविषयी सजग करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ठाणे पोलिसांची मदत घेत मुली तसेच त्यांच्या पालकांचे एकत्रित मेळावे घेण्यात येणार असून यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात येणार आहे. विभाग स्तरावर हे मेळावे घेण्यात येणार असून महापालिका शाळांच्या परिसरात गस्त वाढवावी, अशी मागणी शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या मराठी माध्यामाच्या १२४ प्राथमिक शाळा असून त्या सुमारे ८७ इमारतींमध्ये भरविण्यात येतात. या शाळांमध्ये पहिली ते सातवीचे सुमारे ३६ हजार ३२० विद्यार्थी शिकत असून त्यामध्ये १७ हजार ५४४ मुलींचा समावेश आहे. तसेच महापालिकेच्या इंग्रजी माध्यमाच्या पाच प्राथमिक शाळा असून त्यामध्ये एक हजार ७५९ विद्यार्थी शिकत आहेत. त्यामध्ये ८६२ मुलींचा समावेश आहे. तसेच या शाळांचे आठ गट स्तरांवर कामकाज चालते. गेल्या काही महिन्यांपासून महिला तसेच मुलींवरील अत्याचाराचे गुन्हे वाढीस लागले आहेत. त्यामुळे या वाढत्या घटना लक्षात घेऊन महापालिका शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना सुरक्षिततेविषयी सजग करण्यासाठी शिक्षण मंडळाने ठोस पावले उचलली आहेत. त्यासाठी स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा मेळावा घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला असून या मेळाव्यांची आठ विभाग स्तरावरांवर आखणी करण्यात येणार आहे. या मेळाव्यांमध्ये स्थानिक पोलीस अधिकारी महापालिका शाळेतील विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांशी मुक्तपणे संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यामध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे धडेही देण्यात येणार आहेत. या वृत्ताला ठाणे महापालिका शिक्षण मंडळ अध्यक्ष सुरेश गडा यांनी दुजोरा दिला असून येत्या नव्या वर्षांत स्थानिक पोलिसांच्या माध्यमातून महापालिका शाळेतील विद्यार्थिनी आणि पालकांचे मेळावे घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त के. पी. रघुवंशी यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. तसेच शाळेच्या परिसरात रोडरोमिओंकडून मुलींच्या छेडछाडीचे प्रकार घडू नयेत, यासाठी शाळा भरताना आणि सुटतानाच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही त्यांच्याकडे करणार असल्याचे सुरेश गडा यांनी सांगितले.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा