प्रशांत मोरे
प्राचीन काळापासून गणित, खगोल, ज्योतिष आणि तत्त्वज्ञानाची समृद्ध परंपरा लाभल्यानेच आधुनिक काळात भारतीयांनी तंत्रज्ञानात प्रगती साधली, असा ठाम विश्वास असणारे जपानमधील क्योटो सँग्यो विद्यापीठातील सांस्कृतिक अध्यासनाचे प्रमुख मिचियो यानो सध्या त्यांच्या १३ विद्यार्थ्यांसह विद्या प्रसारक मंडळाच्या निमंत्रणावरून ठाणे शहरात आले आहेत. जपान आणि भारत या आशिया खंडातील दोन देशांमधील सांस्कृतिक आदान-प्रदान हा त्यांच्या अभ्यास दौऱ्याचा मुख्य हेतू आहे. सध्या संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये ते विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधत असून १४ सप्टेंबपर्यंत त्यांचा मुक्काम आहे. थोडक्यात ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणात सध्या वेद, योग आणि तंत्राचा जणू काही ‘आशिया’ना भरला आहे.
प्रा. मिचियो यानो विद्यार्थिदशेत असल्यापासून संस्कृत भाषेचा अभ्यास करीत आहेत. त्यातूनच आयुर्वेद, वैदिक गणित, ज्योतिष आणि तत्त्वज्ञान हे विषय त्यांना कळले. १९७५ मध्ये ते सर्वप्रथम भारतात आले. त्या वेळी त्यांनी हिमालय पालथा घातला. पुढल्या खेपेत ते तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भेटले. भारतीय संस्कृती आणि परंपरा हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. तब्बल २२ वेळा भारतात येऊन त्यांनी येथील विविध प्रदेशात प्रचलित असणारे पारंपरिक ज्ञान समजून घेतले. भारताने तंत्रज्ञानात केलेल्या प्रगतीचे मूळ त्यांच्या समृद्ध अशा प्राचीन पारंपरिक ज्ञानात आहे, या निष्कर्षांप्रत आलेल्या यानो यांनी आपले हे संशोधन स्पष्ट करून सांगणारे एक पुस्तकही जपानी भाषेत लिहिले आहे. क्योटो सँगो विद्यापीठात पदवी शिक्षण घेणारे कोंडू युकी, ओगाशी हिसुये, ओकाई हिरुतका, कावासकी सोता, तवाता ततासुकी, तोयोकवा हरूमी, निशिकुरा सेहा, मोरीशिगे तकुमा, योशिदा युइका, योशिदा राई, शिबुया साची, शिनके योशिनो आणि मिताया इरिका हे विद्यार्थी-विद्यार्थिनी त्यांच्यासोबत आहेत. सध्या ते इंग्रजी, हिंदी भाषा परिचय तसेच योगाचे धडे गिरवीत आहेत. यानिमित्ताने भारत आणि जपान या दोन्ही देशांमधील धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे आदान-प्रदान सध्या ठाणे महाविद्यालय संकुलात सुरू आहे. त्याबरोबरच नृत्य-संगीत, चित्रपट आदी कलांचाही ते आस्वाद घेत आहेत.
संस्कृत भाषेचा अभ्यास केल्यानेच भारतातील या प्राचीन ज्ञानाचा मला परिचय झाला. जपानमधील भावी पिढय़ांनीही हे पारंपरिक ज्ञान समजून घ्यावे, या हेतूने सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी भारतात घेऊन येतो. विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांनी बोलावले आणि आम्ही ठाण्यात आलो, अशी माहिती यानो यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना दिली. जपानमधील बौद्धमंदिरांमध्ये गौतम बुद्धासोबत गणपती, इंद्र, सरस्वती, लक्ष्मी, अग्नी आदी हिंदू परंपरेतील देवतांचेही पूजन होते. त्याचबरोबर महाभारतातील एक प्रमुख व्यक्तिरेखा असणाऱ्या धृतराष्ट्रासही जपानमध्ये देवतांच्या पंक्तीत बसविण्यात आले आहे. अशा प्रकारे भारतीय आणि जपानी धार्मिक परंपरेतील अनेक साम्यस्थळे यानो दाखवून देतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा