प्राथमिक शिक्षणाबरोबरच योगाभ्यासाचे चार धडे मिळाल्यास विद्यार्थ्यांचा मानासिक, शारीरिक आणि आध्यात्मिक विकास होईल, या उद्देशाने नवी मुंबई पालिका शाळेतील शिक्षकांसाठी सुरू करण्यात आलेली योग प्रशिक्षण कार्यशाळा योगाभ्यास शिकविणाऱ्या संस्थेने शुल्क मागितल्यानंतर बंद करण्यात आल्याचे समजते. विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास करण्यात राज्यात आघाडीवर असणाऱ्या नवी मुंबई पालिकेच्या शिक्षण मंडळाने या शुल्क मागणीवर मात्र निद्रासन धारण केलेले आहे. त्यामुळे योग शिकविणाऱ्या वाशीतील योग विद्या निकेतन या संस्थेची मोठी पंचाईत झाली आहे.
राज्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहाराबरोबरच आयुष्यात शारीरिक व मानसिक स्वास्थ्य टिकविताना कामी येणारा योगाभ्यास शिकविण्यात यावा,असा एक मतप्रवाह आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूरमध्ये असा प्रयोग केला होता. त्यामुळे ठाण्याचे पालकमंत्री गणेश नाईक व महापौर सागर नाईक यांनी ही कल्पना उचलून धरली आहे. मंत्री नाईक यांनी तर दहा वर्षांपूर्वी ही संकल्पना ठाण्यातील एका जाहीर कार्यक्रमात, नवी मुबंई पालिकेने लवकरात लवकर ही संकल्पना राबवावी अशा सूचना केलेल्या आहेत. पण पालिका अधिकाऱ्यांनी ती कधीच मनावर घेतली नाही. अनेक वक्रासन घातल्यानंतर पालिकेने नऊ डिसेंबरपासून ही संकल्पना सुरू केली. योगा मधील बहुमोल कार्यामुळे पद्मश्री मिळालेले आणि आज नव्वदीतही स्वत: योग वर्ग घेणारे सदाशिव निंबाळकर यांच्या वाशी येथील योग विद्या निकेतनच्या सभागृहात पालिकेच्या विविध शाळेतील ३४ शिक्षक दररोज ११.३० ते २.३० दरम्यान जाऊन प्रशिक्षण घेत होते. डिसेंबर आणि जानेवारीत प्रत्येकी दहा दिवस झालेल्या या प्रशिक्षणापोटी एका शिक्षकाचे चार हजार प्रति याप्रमाणे ३४ शिक्षकांचे एक लाख ३६ हजार रुपये शुल्क बिल निकेतनने शिक्षण मंडळाच्या मागणीनुसार दिले. हे बिल मागितल्यानंतर शिक्षण मंडळाने निद्रासन धारण केले असून बिल देण्याच्या दृष्टीने हालचाली मंदावल्या आहेत. पालिकेच्या विविध शाळांत ५४६ शिक्षक आहेत. त्यातील २५ टक्के शिक्षकांनी प्रशिक्षण घेतल्यास आणखी दहा ते बारा शिबिरे घेणे क्रमप्राप्त आहे. दोन शिबिरांचे देयक न मिळाल्याने पुढील प्रशिक्षण शिबिरे घ्यायची की नाहीत या संभ्रमात निकेतन पडले आहे.
नवी मुंबईतील प्रथितयश संस्थेच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना योग शिकविण्याची ही संकल्पना होती. राज्यात पालिका शाळांमधील इतर शहरातील विद्यार्थी पटसंख्या घसरत असताना नवी मुंबईत ती वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन शिकविण्याची ही संकल्पना होती. पालिका अधिकाऱ्यांनी तिचे स्वरूप संकुचित करून पाच पन्नास शिक्षकांना हे प्रशिक्षण देऊन मोकळे करण्याचा कार्यक्रम राबविला. आता त्याचे पैसे देतानाही चालढकल केली जात आहे. मूठभर शिक्षकांना शिकवून विद्यार्थी या शास्त्रात निष्णांत होणार नाहीत. त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यास शिकविण्याची गरज असल्याचे मत योग विद्या निकेतनच्या ज्येष्ठ संचालिका शकुंतला निंबाळकर यांनी सांगितले. योग विद्या निकेतनमधून योग शिकलेले हजारो विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा