मुंबई दक्षिण शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथमहोत्सवाच्या मंगळवारी पार पडलेल्या उद्घाटन सोहळय़ाला शिक्षणमंत्र्यांनी काही अपरिहार्य कारण पुढे करत दांडी मारली. यामुळे शिक्षक आणि विद्यार्थीवृंद नाराज झालाच पण त्यानिमित्ताने शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांच्यात सुरू असलेल्या ‘खो-खो’ची चर्चा सुरू झाली असून या ‘खो-खो’मागे दडलय काय? असा सवाल उपस्थित झाला आहे.
शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला मंत्र्यांनी उपस्थित राहून त्यांचे कौतुक करावे, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात मंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे तसे होऊ शकले नाही. असाच अपेक्षा भंग मंगळवारी यशवंतराव चव्हाण केंद्रात पार पडलेल्या ‘सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने’ या कार्यक्रमात शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी केला. त्यांना या कार्यक्रमाला दांडी मारली. विशेष म्हणजे शिक्षणमंत्री विनोद तावडे या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात सचिवांकडून काही अभ्यासपूर्ण आणि सकारात्मक भाष्य ऐकायला मिळेल अशी अपेक्षा उपस्थित संस्थाचालक आणि मुख्याध्यापकांना होती. या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर शालेय शिक्षण विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीची नोंदही होती. मात्र, त्या तिकडे फिरकल्या नाहीत.
लागलीच दुसऱ्या दिवशी बुधवारी ग्रंथमहोत्सवाच्या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री तावडे अनुपस्थित राहिले. या गं्रथमहोत्सवाला शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांनी प्रोत्साहन दिले होते. ग्रंथमहोत्सवाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेत उद्घाटक म्हणून शिक्षणमंत्री तावडे यांचे नाव होते. पण ते आले नाहीत. यामुळे शिक्षणमंत्री तावडे आणि सचिव भिडे यांच्यात खो-खो सुरू असल्याची चर्चा रंगली. या खो-खो मागे नेमके काय कारण आहे याबाबत उलट-सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत. मंगळवारच्या कार्यक्रमाला भिडे यांच्या अनुपस्थितीला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण विषयांवर चर्चा असल्यामुळे त्याचे काम असल्याचे कारण पुढे करण्यात आले. तर बुधवारच्या कार्यक्रमातील तावडेंच्या अनुपस्थितीबाबत कोणतेही कारण सांगण्यात आले नाही. तुकडय़ांना मान्यता देण्याच्या मुद्यांवरून सध्या शिक्षक आणि शिक्षण विभागात चांगलीच खडाजंगी सुरू आहे. याच मुद्यांवरून मंत्री आणि सचिव यांच्यात वाद असल्याचे सूत्रांकडून समजते. यामुळेच ते दोघे एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळत असल्याची चर्चा रंगली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा