‘ग्रंथ तुमच्या दारी’ आक्कीज् पाठशालामध्ये दाखल
नवजीवन फाऊंडेशन संचलित लेखानगर येथील आक्कीज् पाठशालेत विश्वास ज्ञान प्रबोधिनी आणि चव्हाण ग्रंथालय व सार्वजनिक वाचनालय यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या ‘ग्रंथ तुमच्या दारी’ उपक्रमातंर्गत ग्रंथपेटी प्रदान करण्यात आली.
या वेळी वाचनालयाचे उपाध्यक्ष विनायक रानडे, नवजीवनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोमनाथ चौधरी उपस्थित होते. रानडे यांनी शहाणे करून सोडावे, सकल जना असा संकल्प करून तो पूर्ण करण्यासाठी ग्रंथपेटी तयार करण्यात आल्याची माहिती दिली. ही ग्रंथपेटी आक्कीज् पाठशालेत मुलांना त्यांच्या बौध्दिक विकासात भर टाकण्याच्या उद्देशाने देण्यात आल्याचेही रानडे यांनी सांगितले. या ग्रंथपेटीत सर्व प्रकारच्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमास विजय काळे, हेमंत भामरे, प्रकल्प संचालक महेंद्र विंचुरकर हेही उपस्थित होते. सुनील उद्गिरे यांनी मुलांना खाऊचे वाटप केले.

‘रायन’ मध्ये कार्यशाळा
नाशिक येथील रायन इंटरनॅशनल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. अगास्टिन फ्रान्सिस पिंटो व व्यवस्थापक ग्रेस पिंटो यांनी संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी अॅस्टोनिअन्स विद्यार्थ्यांना आमंत्रित करून कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले. रायनचे विद्यार्थी तेजस बावीस्कर, चिन्मय धार्मिक, एकज्योत सिंग, इफ्रा कुरेशी, आफ्रिन खान, जान्हवी चौहाण, वृषभ गुप्ता, प्रियांका जैन, रिध्दी गुंजाळ, सौरभ चोप्रा यांच्याकडे अॅस्टोनिअन्स विद्यार्थ्यांनी तीन दिवस मुक्काम ठोकत शहरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली. तसेच शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून लोककलांची माहिती दिली

नुतन मराठी शाळेत स्नेहसंमेलन
नाशिक येथील वसंतराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था संचलित नुतन मराठी प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संस्थेचे अध्यक्ष तुकाराम दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी प्रकाश आंधळे, संस्थेचे सहचिटणीस अॅड. पी. आर. गिते, विश्वस्त रामप्रसाद कातकाडे, संचालक महेंद्र आव्हाड उपस्थित होते. स्वागत मुख्याध्यापक सुरेश ताडगे यांनी केले. यावेळी आंधळे यांनी आपल्या मुलाला परीक्षेत किती गुण मिळाले हे पाहण्यापेक्षा त्याच्या अंगात कोणते कलागुण आहेत व त्यांचा विकास करणे कसे गरजेचे आहे हे लक्षात घ्यावे असा सल्ला पालकांना दिला.  दिघोळे यांनीही मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन गीता बागूल यांनी केले. सुनिता घुगे यांनी आभार मानले.

प्रयोगशाळा तंत्र विकसन’ कार्यशाळा
पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या वतीने प्रयोगशाळा सहाय्यक व प्रयोगशाळा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासाठी चार व पाच फेब्रुवारी रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी. एस. जगदाळे यांनी दिली. कार्यशाळेचे उद्घाटन पुणे विद्यापीठाचे बीसीयुडीचे संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. एस. व्ही. पाटील, डॉ. राजन कुलकर्णी, डॉ. अभिषेक पिंप्राळकर, डॉ. के. एच. कापडणीस, एस. बी. देशमुख, एस. बी. धामणे, व्ही. जे. थेटे आदी मार्गदर्शन करणार आहेत. प्रयोगशाळेत केमिकल्स सेफ्टी व साहित्याचा वापर यावर चर्चा होणार आहे.

‘ब्रम्होत्सव २०१३’
नाशिक ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्रह्मा व्हॅली शैक्षणिक संकुलाच्या वतीने आयोजित ‘ब्रह्मोत्सव २०१३’ चे उद्घाटन डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या हस्ते झाले.
या वेळी डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य दिले तर त्यामध्ये ते सर्वोत्तम कामगिरी बजावू शकतात, असे सांगितले. विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासापुरचे मर्यादित न ठेवता त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळवून देण्याच्या दृष्टीने ब्रह्मोत्सव हे व्यासपीठ योग्य असल्याचे ते म्हणाले. डॉ. गायकवाड यांनी विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या शिक्षण, प्रशिक्षणाचा वापर समाजाच्या कल्याणासाठी करण्याचे आवाहन केले. दरम्यान राजाराम पानगव्हाणे यांनी संस्थेच्या कार्याचा आलेख सादर केला. प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी आगामी युग हे युवा व महिलांचे असल्याचे सांगत देशाच्या १२१ कोटी लोकसंख्येपैकी ४९ टक्के लोकसंख्या युवक व युवतींनी व्यापलेली असल्याचे सांगितले. व्यसनासारख्या वाईट मार्गाला न लागता विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती साधण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या वेळी भगवान खैरनार, अशोक सोनवणे, माधव चव्हाण आदी उपस्थित होते. आभार प्राचार्य सुनील बच्छाव यांनी मानले.

छात्र भारतीचा मोर्चा
छात्रभारती विद्यार्थी संघटना, लोकभारती आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण हक्क कृती समिती यांच्या वतीने दोन फेब्रुवारी रोजी दादर ते नांर्दुला टँक मैदान दरम्यान मोर्चा काढण्यात येणार आहे. मोर्चाचे नेतृत्व आ. कपिल पाटील आणि छात्रभारतीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. शरद कोकाटे करणार आहेत. बीसीए, बीबीए, एमबीए, बीसीए या व्यावसायिक प्रशिक्षणाचे विभाजन,  इतर मागासवर्गीय आणि विशेष मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पूर्ववत सुरू करावी, दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, खासगी विद्यापीठ विधेयक त्वरीत रद्द करावे, सर्व विद्यार्थ्यांना रेल्वे व बसचे पास मोफत करावे, दोन लाख उत्पन्न मर्यादेतील सर्वाना ईबीसी सवलत द्यावी, कंत्राटी पध्दत बंद करावी, शिक्षणाचे व्यापारीकरण आणि कंपनीकरण बंद करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. मोर्चात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी ९४२२५१०५७२ या क्रमांकावर संपर्क साधावा.