निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव
नाशिक एज्युकेशन सोसायटीने शैक्षणिक उपक्रम समितीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दीनिमित्त संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित निबंध स्पर्धेतील विजेत्यांना परशुराम साईखेडकर नाटय़गृहात आयोजित कार्यक्रमात गौरविण्यात आले.
कर्मचारी व विद्यार्थी यांच्या विचारांना चालना देण्याचा हा उपक्रम असल्याचे गौरवोद्गार या वेळी ‘कल्पक’ निर्मित ‘शोध कवितांचा’ कार्यक्रमाचे निर्माते महेश पाटणकर यांनी काढले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. व्यासपीठावर कलाकार महेश पाटणकर, वंदना जोगळेकर, संस्थेचे उपाध्यक्ष रमेश देशमुख, निमंत्रक व मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर, संस्था सहकार्यवाह दिलीप अहिरे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन मुग्धा कळकर यांनी केले. आभार रंजना परदेशी यांनी मानले.
उन्नती विद्यालयात प्रमाणपत्रांचे वाटप
दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथील उन्नती विद्यालयात वार्षिक सोहळ्यात विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. संगणक कक्षाचे उद्घाटनही या वेळी झाले. अध्यक्षस्थानी उन्नती एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अशोक सोनजे होते. या प्रसंगी मनीषा बोडके, शाम बोडके, शालेय समिती अध्यक्ष दिलीप पाटकर, सरचिटणीस प्रवीण अमृतकर, सदस्य सतीश सोनजे आदी उपस्थित होते. मान्यवरांनी संगणकाचे महत्त्व मांडले. विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
प्रास्ताविक मुख्याध्यापक डी. डी. नेरकर यांनी केले. सूत्रसंचालन एस. एम. धामणे यांनी केले. आभार व्ही. एस. भदाणे यांनी मानले.
सारडा विद्या मंदिरात लॉर्ड पॉवेल जन्मदिनाचा कार्यक्रम
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्या मंदिरमध्ये स्काउट गाइडचे जनक लॉर्ड पॉवेल यांचा जन्मदिन चिंतनदिन म्हणून साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापिका सरोजिनी तारापूरकर या होत्या. प्रारंभी पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी तारापूरकर यांनी पॉवेल यांचे भारतीय स्काउट गाइड चळवळीसाठीच्या योगदानाचा ऊहापोह केला. व्यासपीठावर पर्यवेक्षिका गीता कुलकर्णी, स्काउट प्रमुख प्रियंका निकम, तारा घोडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शांकरी वैद्य यांनी केले.
एम.कॉम.च्या बदलत्या अभ्यासक्रमावर चर्चा
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ यांच्या सहकार्याने व्यापारी अर्थशास्त्र मंडळातर्फे आयोजित कार्यशाळेत २०१३-१४ पासून एम.कॉम.साठी राबविण्यात येणारी श्रेयांक पद्धत तसेच बदलत्या परिस्थितीनुसार दर्जेदार अभ्यासक्रम तयार व्हावा यासाठी सखोल चर्चा करण्यात आली.
कॅनडा कॉर्नरवरील पुणे विद्यापीठ विभागीय कार्यालयात झालेल्या या कार्यशाळेस नाशिक व नगर जिल्ह्यातील बहुसंख्य प्राध्यापक उपस्थित होते. व्यापारी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. आर. निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. एल. साळी, पुणे विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ. विजय मेधने, पुणे विद्यापीठ नाशिक उपकेंद्राचे समन्वयक डॉ. सतीश श्रीवास्तव यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यशाळेत डॉ. आर. आर. बेराड, डॉ. एस. एन. कुलकर्णी, डॉ. सतीश श्रीवास्तव व्यापारी अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य डॉ. बी. खेडकर आदींनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. साळी यांनी स्वागत केले. तर डॉ. एम. के. पगार यांनी आभार मानले.

Story img Loader