शालेय व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रसंगी प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी तसेच विद्यालय आवारात राष्ट्रध्वज वापराबाबतच्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरले जाणार आहे. राष्ट्रध्वजाचा आदर करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पाश्र्वभूमीवर, शिक्षण विभागाने प्लास्टिक राष्ट्रध्वजाचा कुठेही वापर होऊ नये आणि राष्ट्रध्वजाचा मान राखला जाईल यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना केल्या आहेत.
प्रजासत्ताक दिन असो वा स्वातंत्र्य दिन असो, हे दिवस सर्वत्र मोठय़ा उत्साहात साजरे केले जातात. या निमित्त शाळा, महाविद्यालये, खासगी व शासकीय आस्थापना आदी ठिकाणी ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन केले जाते. या दिवशी लहान आकारातील कागदी व प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री मोठय़ा प्रमाणात होत असते. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी राष्ट्रभक्ती व उत्साहापोटी हे राष्ट्रध्वज विकत घेतात. हे ध्वज त्याच दिवशी सायंकाळी अथवा दुसऱ्या दिवशी इतस्तत: टाकले जातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमाच्या वेळी तसेच विशेष कला-क्रीडा कार्यक्रमावेळी वैयक्तिकरित्या वापरल्या जाणाऱ्या राष्ट्रध्वजाचा मान राखला जात नसल्याचे दिसते. रस्त्यात व इतरत्र विखुरलेले हे राष्ट्रध्वज प्लास्टिकचे असतील तर असे ध्वज नष्ट होत नसल्याने अनेक दिवस तिथेच दृष्टीपथास पडतात. राष्ट्रप्रतिष्ठेच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. गृह विभागाच्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकच्या वापरात मान्यता नाही याची जाणीव शिक्षण विभागाने शैक्षणिक संस्थांना करून दिली आहे.
शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रसंगी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी. या संदर्भात विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी संस्थांवर टाकण्यात आली आहे. गरजेनुसार वैयक्तिक वापरासाठी छोटय़ा कागदी ध्वजांचा वापर करता येईल. कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करताना त्याचा योग्य मान राखला जाईल याची दक्षता घ्यावी, असेही सूचित करण्यात आले आहे. कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर वा अन्य ठिकाणी फेकून देवू नयेत. असे आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतूदीनुसार सन्मानपूर्वक नष्ट करावे, असेही शैक्षणिक संस्थांना सांगण्यात आले आहे. राष्ट्रध्वज वापराबाबतचे सर्व अधिनियम, आदेश व सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना विद्यालय आवारात कायमस्वरुपी फलकांच्या सहाय्याने प्रदर्शित केल्यास प्रबोधन होईल. विद्यालयांच्या आवारात राष्ट्रध्वज वापराबाबतच्या आदेशाचा भंग झाल्यास संबंधित व्यवस्थापनास जबाबदार धरले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
राष्ट्रध्वज वापराबाबत ठळक सूचना
ल्ल प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर करू नका.
ल्ल लहान आकारातील कागदी ध्वजाचा आवश्यकतेनुसार वापर करावा.
ल्ल राष्ट्रध्वजाचा मान राखा.
ल्ल रस्त्यावर व अन्य ठिकाणी ध्वज आढळल्यास ध्वज संहितेनुसार कार्यवाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा