‘जाहिरात आणि विपणन क्षेत्रात मुलांचे स्थान व महत्त्व काय आहे. माझ्या मते मुलांचे या क्षेत्रातील वर्तमान आणि भविष्य दोन्ही अंधकारमय आहेत. आताच्या मुलांना स्वतंत्र अस्तित्व आहे. त्यांचं स्वत:चं एक विश्व आहे. पण, त्यात त्यांचा हात धरून जबाबदारीने त्यांना पुढे नेणारे कोणी नाही. या क्षेत्रात मुलांचे काय प्रश्न आहेत आणि का आहेत?, याची उत्तरे शोधून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न मी करेन’, हे आश्वासन आहे अ‍ॅडगुरू प्रल्हाद कक्कर यांचे. एज्युमीडिया या संस्थेने आयोजित केलेल्या ‘डिकोडिंग किड्स’ या कार्यक्रमात ते मुलांसाठीचे मार्केटिंग या विषयावर प्रल्हाद कक्कर बोलत             होते.
आजघडीला मुलांसाठी स्वतंत्र वाहिन्या आहेत. टुथपेस्ट, साबणापासून कपडे आणि स्वत:च्या बँकिंग खात्यापर्यंत प्रत्येक गोष्ट मुलांसाठी निर्माण केली गेली आहे आणि मुलांसाठीच्या या सेवांची, उत्पादनांची तितक्याच जोरदारपणे जाहिरातबाजीही केली जाते. या जाहिरातींमध्ये काम करणारी मुले आणि त्यांच्याकडून काम करवून घेणाऱ्या एजन्सीज असे एक मोठे अर्थकारणही यामागे आहे. मात्र, मुलांसाठी उत्पादनाची निर्मिती, विपणन आणि विक्री करत असताना त्याचा त्यांना कितपत उपयोग आहे?, खरोखरच उपयोग आहे का?, मुलांसाठीच्या जाहिराती, कार्टून मालिका, बालचित्रपट यांची निर्मिती करत असताना या माध्यमातून त्यांच्यापर्यंत कोणती मूल्ये, संस्कार आपण पोहोचवतो आहोत, याचा गंभीरपणे विचार या क्षेत्रातील व्यावसायिकांकडून केला जातो का?, अशा कित्येक प्रश्नांची थेट उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. यात अ‍ॅडगुरू प्रल्हाद कक्कर, लहान मुलांचा लाडका ‘छोटा भीम’ची निर्मिती करणारे राजीव चिलाका, एनएसईचे उपाध्यक्ष रवी वाराणसी, कांगारू किड्स एज्युकेशनच्या अध्यक्षा लीना अशर, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी आणि एज्युमीडिया संस्थेच्या कार्यकारी संचालक तबस्सुम मोदी अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
‘छोटा भीम’च्या निर्मितीमागची कथा सांगत या विषयावर आपल्याला आलेला अनुभव राजीव चिलाका यांनी उपस्थितांना सांगितला. मुलांसाठी कशा प्रकारचे कार्यक्रम असायला हवेत, यात आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या मूल्यांबद्दल विचार करून त्याप्रकारे मालिकांची निर्मिती करायला हवी, हा विचार इथे सहसा आढळत नाही. मुलांमध्ये काय लोकप्रिय आहे तेच त्यांना देण्याचा प्रकार सर्रास असतो. मात्र, या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुलांना खरोखरच काय हवे आहे, याची जाणीवही झाली आणि लोकांच्या मनात ज्या शंका होत्या त्यांना उत्तरे देण्याची संधीही मिळाली, असे चिलाका यांनी सांगितले.
 ‘मुलांसाठीचे मोठे मार्केट आपल्याकडे आहे पण, त्यात गरजेचा भाग कमी आणि चैनीचा भाग जास्त आहे. टीव्हीचा विचार करता मुलांना जे नको तेच आपण घरबसल्या दाखवत असतो. मग मुलांसाठी म्हणून निर्मिती करत असताना या क्षेत्रातील जाणकार मुलांपर्यंत आपण काय पोहोचवू पाहत आहोत, याचा विचार करतच नाहीत का?’, याचे उत्तर त्यांच्याचकडून जाणून घेण्याचा उद्देश या कार्यक्रमामागे होता असे तबस्सुम मोदी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
लहान मुलांना डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या जाहिरात, जनसंपर्क, चित्रपट-टीव्ही, उत्पादक कं पन्या अशा विविध क्षेत्रांतील १६ तज्ज्ञांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. मुलांसाठी मार्केटिंग करत असताना मूल्यांपेक्षाही नफ्याचाच जास्त विचार केला जातो, याची प्रत्यक्ष कबुलीच या तज्ज्ञांनी    दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा