*  कमी पोलीस संख्येमुळे जादा काम
*  ५०० नागरिकांमागे अवघा एक पोलीस
उपनगर ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी जगन्नाथ सोनवणे यांच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवरील कामाचा, वाढत्या वाढत्या ताणाचा मुद्दा चर्चेत आला आहे. शहरातील बहुतांश ठाण्यात मंजूर पदांपेक्षा कमी कर्मचारी आहेत. त्यातच सलग १२ तास काम करावे लागत असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना मानसिक ताणतणावाबरोबर प्रकृती अस्वास्थतेच्या समस्यांना सामोरे जावे लागत असून हा ताण हलका करण्यासाठी प्रभावीपणे ठोस उपाय योजणे आवश्यक झाले आहे. राज्याच्या गृह मंत्र्यांकडून वारंवार केवळ नव्याने पोलीस भरती केली जाईल असे सांगितले जाते, परंतु ते सेवेत कधी येतील हे गुलदस्त्यात ठेवले जाते.
नाशिक पोलीस आयुक्तालयातंर्गत एकूण ११ ठाणे आहेत. पोलीस ठाणे व आयुक्तालय यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मंजूर पदे २५४९ असली तरी सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या २४८९ आहे. प्रत्येक ठाण्यातील आकडेवारीवर नजर टाकल्यास कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याचे लक्षात येते. भद्रकाली ठाण्यात १८९ मंजूर पदे असून कार्यरत कर्मचारी १४० आहेत. म्हणजे ४९ कर्मचाऱ्यांची कमतरता. पंचवटी ठाण्यातही ८४, गंगापूर १९, आडगाव २२, सरकारवाडा ५, इंदिरानगर पोलीस ठाण्यात २५ कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. सातपूर व अंबड ठाण्यात मंजूर पदांपेक्षा काहिसे अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले असले तरी औद्योगिक वसाहतीमुळे तेही कमी पडतात, अशी स्थिती आहे. जागतिक पातळीवर सर्वसाधारपणे १२० ते १२५ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असा निकष आहे. तथापि, शहरातील पोलीस यंत्रणेचे संख्याबळ लक्षात घेतल्यास सुमारे ४५० ते ५०० नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी अशी स्थिती आहे. लोकसंख्येचा विचार करता कर्मचाऱ्यांची संख्या अतिशय कमी आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे जे मनुष्यबळ उपलब्ध आहे, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा पडणे ओघाने येते. कामाचा हा ताण त्यांच्या प्रकृती अस्वास्थतेचे कारण ठरत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम दिवस आणि रात्र अशा दोन पाळ्यांमध्ये सुरू असते. कधी कधी अकस्मात घडणाऱ्या घटनांमुळे सुटी होण्याची वेळही निश्चित नसते. बंदोबस्त, मंत्र्यांचे दौरे, शहरात निघणारे मोर्चे, तपास प्रक्रियेत गुरफटलेला अधिकारी व कर्मचारी स्वत:साठी किंबहुना कुटुंबियांसाठी देखील पुरेसा वेळ देऊ शकत नाही. वेळी-अवेळी जेवण, प्रदूषण, सातत्याने कामाचा ताण यामुळे सांधेदुखी, रक्तदाब, मधुमेह, स्थुलता, चिडचिडेपणा अशा विकारांचा सामना त्यांना करावा लागतो. कामाचा ताण, पुरेशी झोप न मिळणे, धावपळ, कुटुंबियांना पुरेसा वेळ देता न येणे यामुळे एका विचित्र दडपणाखाली अनेक जण वावरतात. त्याचा परिणाम घरातील शांततेवरही होत असतो.
आयुक्तालयामार्फत कर्मचाऱ्यांवरील हे ताणतणाव कमी करण्यासाठी काही उपक्रम राबविले जातात. प्रत्येकाला साप्ताहीक सुट्टी मिळेल, याचीही दक्षता घेतली जाते. कर्मचाऱ्यांवरील हा ताण हलका करण्यासाठी नियमित कवायत, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तणाव नियंत्रणाचे शिबीर, नियमित आरोग्य तपासणी केली जात असल्याची माहिती पोलीस उपायुक्त (प्रशासन) नंदकिशोर चौघुले यांनी ‘नाशिक वृत्तान्त’ला दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा