ध्वजवंदन, पोलीस अधिकारी व कामगारांचा सत्कार, जिल्हा क्रीडा पुरस्कारांचे वितरण, राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे उद्घाटन अशा विविध उपक्रमांनी उत्तर महाराष्ट्रात बुधवारी महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५३ वा वर्धापन दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला.
येथील पोलीस कवायत मैदानावर झालेल्या मुख्य कार्यक्रमास विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पोलीस दलातर्फे संचलन करण्यात आले. भुजबळ यांनी दुष्काळाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. राज्याला सध्या पाणीटंचाईच्या समस्येने ग्रासले आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सर्वानी मिळून प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले. मोठी लढाई व चळवळीनंतर मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राचा विकास आराखडा तयार केला. त्यात राज्य शैक्षणिक, कृषी तंत्रज्ञानात कसे पुढे जाईल याचा अभ्यास करण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्र आज सर्व क्षेत्रांत आघाडीवर आहे. देशाच्या प्रगतीसाठी राज्याचा विकासही महत्त्वाचा आहे. आजच्या टंचाईचा सामना करण्यासाठी, राज्याच्या प्रगतीसाठी सर्वाच्या श्रमाची, मेहनतीची, कष्टाची गरज आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, यावेळी पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यात महाराष्ट्र पोलीस अकादमीतील पोलीस अधीक्षक संजय पाटील, पोलीस उपायुक्त एस. जी. दिवाण व डॉ. डी. एस. स्वामी, साहाय्यक पोलीस आयुक्त गणेश शिंदे व हेमराज सिंह राजपूत, पोलीस निरीक्षक रावसाहेब भोसले, धनराज दायमा, साहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे, पोलीस उपनिरीक्षक योगेश देवरे, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तोताराम वाजे, विनोद पाटील आदींचा समावेश आहे. उत्कृष्ट तलाठी म्हणून उमरपाडा येथील कृष्णा गावंडे यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी शैक्षणिक साहाय्य आणि नैसर्गिक प्रसूती साहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे उद्घाटन यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.
नाशिकरोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ध्वजवंदन सोहळा महापौर अॅड. यतिन वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. पालिकेतील उत्कृष्ट वाहनचालकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी आयुक्त संजय खंदारे, उपमहापौर सतिश कुलकर्णी, स्थायी समिती सभापती रमेश धोंगडे आदी उपस्थित होते. आयटकच्या वतीने कामगार दिन व महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ कवी कैलास पगारे व कामगार कर्मचारी नेते राम गायटे यावेळी मान्यवर म्हणून उपस्थित होते. नंदुरबार येथील पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजवंदन कार्यक्रम पालकमंत्री अॅड. पद्माकर वळवी यांच्या उपस्थितीत झाला. वळवी यांनी नंदुरबार जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केल्याचे सांगितले. तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्यात येत असून सातपुडय़ाचे गतवैभव प्राप्त करण्यासाठी वृक्ष लागवड करण्यात येत असल्याचे नमूद केले. यावेळी पोलीस विभागात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह पोलीस अधीक्षक डॉ. संजय अपरांती यांना देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक संजय गुंजाळ, पोलीस निरीक्षक बी. पी. पारधी यांच्या नेतृत्वाखाली संचलन झाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा