शहरातून जाणाऱ्या नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील द्वारका ते बिटको चौक या महापालिका हद्दीतील साडे पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचा प्रस्ताव केंद्रीय भूपृष्ठ आणि रस्ते मंत्रालयाने नुकताच मंजूर केला आहे. यामुळे सध्याचा चौपदरी रस्ता सहापदरी होणार असून या कामासाठी साडे आठ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हा शहरातून जाणारा मार्ग सध्या चौपदरी आहे. द्वारका ते नाशिकरोड परिसरातील बिटको चौक या संपूर्ण मार्गावर आसपास मोठी नागरी वसाहत असल्याने आणि या मार्गाने पुणे व शिर्डीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी असल्याने सध्याचा मार्ग अपुरा पडत होता. आगामी सिंहस्थात नाशिकरोड रेल्वे स्थानकावरून शहरात येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणिय राहणार असल्याने या टप्प्याचे विस्तारीकरण करण्याची मागणी कित्येक वर्षांपासून केली जात होती. नाशिक-पुणे रस्त्याचे नाशिक ते सिन्नर आणि सिन्नर ते राजगुरूनगर या दोन टप्प्यात रुंदीकरण होणार असल्याने महापालिका हद्दीतील द्वारका ते बिटको चौक या साडे पाच किलोमीटर अंतराचेही रुंदीकरण करण्यात यावे, अशी मागणी खा. समीर भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ठ, रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडे
केली होती.
या संदर्भात सर्व तांत्रिक प्रक्रिया आगामी दोन महिन्यात पूर्ण होऊन पावसाळ्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. त्यानंतर साधारणत: वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. या मार्गावर चार फूट रुंदीचे आणि दोन फूट उंचीचे दुभाजक राहतील. त्यात शोभेची झाडे लावण्यात येणार आहेत.
नाशिक आणि नाशिकरोड भागाला जोडणाऱ्या महामार्गावर वाहतुकीची अतिशय वर्दळ असल्यामुळे या परिसरात नेहमीच अपघात होत असतात. या रस्त्यावर काठेगल्ली, फेम चित्रपट गृहाजवळील परिसर, उपनगर, दत्तमंदिर चौक या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते. त्यामुळे या महामार्गाचे रुंदीकरण करण्याची गरज व्यक्त
होत होती.
सध्या मुंबई-आग्रा महामार्गावरील विल्होळी ते आडगाव हा रस्ता सहापदरी झाला आहे. या विस्तारीकरणामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजुला एक-एक जादा मार्ग वाहतुकीसाठी उपलब्ध होणार आहे. या रस्त्याच्या विस्तारीकरणासाठी
साडे आठ कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यासाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा