शहरातील मोगलाई भागात भारनियमनाची वेळ अक्षरश: सुलतानी पद्धतीने वाढविण्यात आल्याने भारनियमन बंद करावे, अशी मागणी करणाऱ्या शिवसेना आंदोलनकर्त्यांची एका माहितीपत्रातून वीज वितरणाचा तपशील व गळती तपशीलवार मांडत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी बोळवण केली. मोगलाई फिडरवरून त्रमासिक ७१.४२ टक्के युनिट नुकसान असल्यानेच ग्राहकांना तब्बल साडेआठ तास विजेशिवाय राहावे लागत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोगलाई उपविभागप्रमुख महादू गवळी यांच्यासह संदीप सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा नेला. मोगलाई भागातील भारनियमन रद्द करावे अशी मागणी मोर्चेकऱ्यांची होती. या आंदोलनानंतर वीज कंपनीने शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. एन. सानप यांनी गवळी यांना पत्रातून वीज वितरणातील वस्तुस्थिती कळवून या भागातील ग्राहकांच्या संतप्त भावनांना थोपविण्याचा प्रयत्न केला. मोगलाई परिसर हा ११ केव्ही फिडरवर येतो. जानेवारीअखेर एक हजार ७०४ ग्राहकांसाठी एक हजार ३९ एवढा केव्ही भार जोडला आहे. फिडरवरून जवळपास ११ लाख ९९ हजार ८४० युनिट वीज महिन्यात वापरल्याची नोंद आहे. असे असताना प्रत्यक्षात मात्र तीन लाख ४१ हजार ३०९ एवढय़ाच युनिटची अधिकृत बिले वितरित करण्यात आली. म्हणजे ७१.४२ टक्के युनिट विजेचे नुकसान झाले आहे.
विजेच्या या हानीमुळेच मोगलाई फिडरचा समावेश ‘सीडीएलग्रुप जी २’ मध्ये करण्यात आला आहे. या ग्रुपमधील ग्राहकांना साडेआठ तास भारनियमन असते असे पत्रात म्हटले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा