महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणांचा न्यायनिवाडा करण्यासाठी जागतिक महिला दिनापासून नागपूर जिल्ह्य़ात महिलांसाठी आठ विशेष न्यायालये सुरू झाली असून राज्यात अशाप्रकारची न्यायालये प्रथमच सुरू केल्याची माहिती प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांनी कळमेश्वर तालुक्यातील शिरज्योती येथे आयोजित कार्यक्रमात दिली.
नागपूर जिल्हा विधि सेवा प्रधिकरण, कमळमेश्वर तालुका विधि सेवा समिती, वन विभाग, नवजीवन सोसायटी व नागपूरच्या राठी जगन्नाथभाई किसन गोपाल जवाहरलाल सृष्टी संवर्धन संस्थान यांच्या विद्यमाने शिरज्योती येथे आयोजित विधि जागृती व पोस्टर प्रदर्शन आयोजित केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा विधि सेवा प्राधिकरणचे सचिव किशोर जयस्वाल, कळमेश्वरचे तालुका न्यायाधीश व्ही.आय. भंडारी, सावनेर तालुक्याचे न्यायाधीश ए.ए. आयचित, कळमेश्वर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अहीर, कळमेश्वरचे पोलीस निरीक्षक संतोष म्हेत्रे, वनसंरक्षक दिलीप टेकाडे, नवजीवन सोसायटीच्या फिलोमीना, लता मंगेशकर दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता उषा रडके, मुंबई उच्च न्यायालयाच्या उपनिबंधक भारती कोळ-जयस्वाल व्यासपीठावर उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीला घरी, समाजात आणि देशात कसे वर्तन करावे, याचे शिक्षण घरातील स्त्री देते. तिच्या या कार्याचे व सेवेचे कौतुक कायमस्वरूपी केले पाहिजे. घरातील काम करणाऱ्या महिलांच्या कार्याचे मूल्यांकन पैशात मोजता येत नाही, असे उपस्थित जनतेला कायद्याची माहिती देताना जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणाले. नागपूर जिल्ह्य़ात जागतिक महिला दिनापासून आठ न्यायालये सुरू केल्याचे महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या संदर्भात बोलताना प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुभाष मोहोड यांनी सांगितले, तर विधि प्राधिकरणाचे सचिव किशोर जयस्वाल यांनी जागतिक महिला दिनाची पाश्र्वभूमी विशद केली. तालुका न्यायाधीश भंडारी व आयचित यांनी कायद्याच्या प्रसार व प्रचारासाठी असे उपक्रम उत्तम असून ते सातत्याने घ्यावेत, अशी सूचना केली. कार्यक्रमाचे संचालन अधिवक्ता राजेंद्र राठी यांनी केले.