मंत्रालयावर धडक देण्याची भाषा एकीकडे केली जात असली तरी आनंदनगरच्या नाक्यावर बरेचसे शिवसैनिक घरचा रस्ता धरत असल्याचे पाहून एकनाथ शिंदे कमालीचे संतापल्याचे चित्र दिसले. काही शिवसैनिक आझाद मैदानाच्या दिशेने निघणाऱ्या गाडय़ांमध्ये बसण्याऐवजी सटकण्याच्या बेतात असल्याचे लक्षात येताच एकनाथरावांनी स्वत: गाडी वळवली आणि मागे असलेल्या कार्यकर्त्यांना मंत्रालयाच्या दिशेने जाणाऱ्या गाडय़ांमध्ये बसा, असे आदेश दिले. संपर्क नेत्याची ही धडपड ‘घोडबंदर’चे शिवसैनिक उघडय़ा डोळ्यांनी पाहात होते. हे पाहून एकनाथरावांचा पारा चढला आणि ‘घोडबंदरवाल्यांनो पळता कुठे गाडय़ात बसा’ असा आवाज त्यांना काढावा लागला. घोडबंदरचे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक तोवर आपल्या वातानुकूलित गाडीत बसून मंत्रालयाच्या दिशेने निघण्याच्या तयारीत होते, हे विशेष. ठाणे शहरचे आमदार राजन विचारेही एका कार्यकर्त्यांच्या दुचाकीवरून गर्दीतून वाट काढत होते. त्यामुळे शिवसैनिकांना गाडीत बसविण्यासाठी एकनाथरावांची सुरू असलेली धडपड उपस्थित शिवसैनिकांनाही केविलवाणी वाटत होती.  
ठाणे आणि शिवसेना हे अनेक वर्षांचे समीकरण आहे. मुंबईनंतर सर्वात कडवा शिवसैनिक माझ्या ठाण्यात आहे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अभिमानाने म्हणायचे. साहेबांचा आदेश येताच करो वा मरोच्या भूमिकेत येणारा शिवसैनिक ठाणेकरांनी अनेकदा पाहिला आहे. नारायण राणे यांच्या बंडानंतर मुंबईत शिवसैनिकांची अवस्था सळो की पळो झाली असताना ठाण्यात मात्र राणे समर्थकांना कडवा प्रतिकार झाला. असा हा कडवा शिवसैनिक गुरुवारच्या मोर्चात त्याच ताकदीने का उतरला नाही, हीच चर्चा गुरुवारी ठाण्यातील राजकीय वर्तुळात रंगली होती. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांमध्ये बेकायदा आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांनी एकमेकांवर आंदोलनांची कुरघोडी सुरू केली आहे. शुक्रवारी कल्याणचे खासदार आनंद परांजपे या प्रश्नावर उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे शिवसेनेने गुरुवारी घाईघाईतच मोर्चाचे आयोजन केले. त्यासाठी पोलिसांची परवानगीची प्रक्रियाही उरकली नाही. शिवसेनेचे आंदोलन म्हणजे ताकदीचा आविष्कार. त्यामुळे पोलीसही कालपासूनच सावधानच्या भूमिकेत होते. मात्र दुपारचा एक वाजला तरी टेंभी नाक्यावर शिवसैनिकांची गर्दी जमत नाही हे पाहून काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही तोंडात बोटे घातली. लाखाची हुल उठली असताना काही हजार कार्यकर्ते जमविताना शिवसेना नेत्यांची मारामारी सुरू होती. विशेष म्हणजे, हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी एकनाथ िशदे आणि त्यांचे समर्थक घाम गाळत असताना काही ‘घोडबंदर’वासी नेते मागे का होते, अशी कुजबूजही या ठिकाणी होती. ठाणे शहर नव्हे तर नवी मुंबई, कल्याण डोंबिवली अगदी भिवंडी, शहापूरमधूनही शिवसैनिक या मोर्चासाठी आले होते. तरीही आठ-दहा हजारांच्या पुढे गर्दी जमू नये, याचे आश्चर्य उपस्थित व्यक्त करत होते. त्यामध्ये काही वरिष्ठ पोलीस अधिकारीही सामील होते, हे विशेष.
जयेश सामंत, नीलेश पानमंद – ठाणे
संघटनात्मक शिस्त, दरारा, एकवाक्यता, लढाऊपणा आणि नेत्याच्या आदेशबरहुकूमाची तालीम करण्याचा कडवा बाणा यासाठी काल-परवापर्यंत अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या ठाण्यातील शिवसेनेला क्लस्टरच्या मुद्दय़ावरून मंत्रालयावर मोर्चा काढताना काही हजारांची गर्दी जमविताना अक्षरश: घाम फुटल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. बेकायदा तसेच धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाठी क्लस्टर मंजूर करा या मागणीसाठी एक लाख नागरिकांचा मोर्चा काढला जाईल, अशी भीमगर्जना शिवसेनेचे ठाणे जिल्ह्य़ातील सर्वेसर्वा आमदार एकनाथ िशदे यांनी केली होती. ठाण्यात शिवसेनेचा मोर्चा आणि आंदोलन म्हणजे संघटित शक्तीचा नमुनाच असतो. गुरुवारी मात्र ही ‘परंपरा’ अक्षरश: मोडीत निघाली. लाखांच्या बाता मारणाऱ्या शिवसेना नेत्यांना दुपापर्यंत हजारांच्या घरात शिवसैनिक जमविणे कठीण गेले.

Story img Loader