एकता कपूरनामक महासर्जनशील डोकं असलेल्या निर्मातीसाठी काय काय करावे लागते, याचे अनुभव तिच्या मालिका आणि चित्रपटांधील समस्त नायक-नायिकांनी गाठीशी बांधले आहेत. तुम्ही तिच्या मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून लोकप्रिय झाला असाल तर मग तिला कोणत्याही काळात, कोणत्याही वयात सहन करण्यापलीकडे पर्याय उरत नाही. असाच एक भयानक अनुभव स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय यांच्या वाटय़ाला आला आहे. एकताच्या ‘क्योंकि साँस भी कभी बहू थी’ या मालिकेने टेलिव्हिजन इतिहासात सर्वाधिक भाग दाखवून विक्रम केला होता. याच मालिके मुळे ‘तुलसी’ अर्थात स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय ही जोडी नावारूपाला आली. आज ही मालिका संपून सहा-सात वर्षे झालीत. दरम्यानच्या काळात स्मृतीने अभिनयाला राम राम ठोकून राजकारणात प्रवेश केला, तर अमरची कारकीर्दच जवळजवळ संपली आहे. आणि तरीही आपल्या नव्या उपक्रमासाठी एकताने या दोघांना पुन्हा पडद्यावर आणण्याचा घाट घातल्याने या दोघांची अवस्था मात्र ‘आम्ही बिच्चारे’ अशी झाली आहे.
‘एक थी डायन’ हा एकता कपूरनिर्मित चित्रपट पुढच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे. डायन हा चित्रपटाचा विषय आहे आणि लोक चेटकीण-हडळ अशा गोष्टी मनापासून स्वीकारत नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना चित्रपटाविषयी आकर्षण वाटावे, यासाठी एकता एकेक क्लृप्त्या लढवते आहे. आपल्या मालिकांमध्ये गाजलेल्या दहा नायिकांना घेऊन तिने डायनशी लढणारी नायिका असा विषय घेऊन ‘एक थी नायिका’ नावाची दहा भागांची विशेष मालिका सुरू के ली आहे. यात एकताच्या सगळ्या नायिका म्हटल्यावर तिच्या पहिल्यावहिल्या ऐतिहासिक मालिकेची नायिका स्मृती तिला हवीच होती. इतक्या वर्षांत भाजपच्या रथांवर चढून प्रचार करण्यात सराईत झालेली स्मृती अभिनयही विसरली आहे आणि अभिनेत्री म्हणून आपले असलेले रूपडेही हरवून बसली आहे. तर अमर कधी ‘बिग बॉस’सारखा एखाददुसरा रिअॅलिटी शो करत टीव्हीला चिकटून राहिला असला तरी अभिनेता म्हणून आलेल्या अपयशामुळे निराश आहे. आणि या दोन विचित्र मन:स्थितीत असलेल्या कलाकारांना केवळ आपल्या हट्टापोटी एकताबाईंनी जोडी म्हणून काम करायला लावले आहे. ‘एक थी नायिका’ या उपक्रमात सामील होण्यास स्मृतीने नकार दिला होता. राजकारणात शिरल्यानंतर लोकप्रतिनिधींनी चेटकीण वगैरे विषयांचे समर्थन करणे तिला गोत्यात आणू शकते. त्यामुळे स्मृतीचा ठाम नकार होता पण, एकताच्या हेक्यापुढे तिचा नकार निराधार झाला. या भागात गुजरातमधील एका नवविवाहितेच्या भूमिकेत स्मृती दिसणार आहे. त्यामुळे या भागात स्मृती आणि अमरच्या लग्नाचाही शाही सोहळा एकताने रंगवला आहे. प्रत्यक्षात सेटवर अवघडल्या अवस्थेत असलेले स्मृती आणि अमर पडद्यावरही त्यामुळे फारच गरीब बिच्चारे दिसत आहेत.
आम्ही बिचारे!
एकता कपूरनामक महासर्जनशील डोकं असलेल्या निर्मातीसाठी काय काय करावे लागते, याचे अनुभव तिच्या मालिका आणि चित्रपटांधील समस्त नायक-नायिकांनी गाठीशी बांधले आहेत. तुम्ही तिच्या मालिकांमधून किंवा चित्रपटांमधून लोकप्रिय झाला असाल तर मग तिला कोणत्याही काळात, कोणत्याही वयात सहन
First published on: 22-03-2013 at 12:58 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapoor wants to start new serial with smriti irani and amar upadhyay