शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि एकताच्या बालाजी प्रॉडक्शनचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ हे दोन्ही चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होते. मात्र, शाहरूखमुळे आता एकताला माघार घ्यावी लागली असून तिचा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आपल्याच ‘रेड चिली बॅनर’ची निर्मिती असल्याने शाहरूखसाठी स्वत:चा चित्रपट जसा महत्त्वाकांक्षी आहे तसाच एकतासाठी तिचा चित्रपट. कारण, ‘वन्स अपॉन..’चा हा सिक्वल असला तरी यात आता अक्षय आणि इम्रान खान अशी पहिल्या चित्रपटात नसलेली जोडी आहे. शाहरूखने एकताशी वाद घालण्यापेक्षा तिच्या बाबांकडे जितेंद्रकडे लाडीगोडी लावून पाहिली. पण, जितेंद्रने सांगूनही एकताने चित्रपट पुढे ढकलण्यास नकार दिला. एकता आणि करण जोहरची घट्ट मैत्री सर्वश्रुत आहे. शाहरूखची अडचण ऐकून मग करणने एकताशी लांबलचक गप्पांचा कार्यक्रम केला. आणि गप्पागप्पांमध्ये अगदी प्रेमाने दोन्ही चित्रपटांच्या एकत्र प्रदर्शित होण्यामागे असलेले नुकसानीचे गणित समजून सांगत चित्रपट पुढे ढकलण्याची कल्पना तिच्या गळी उतरवली.
खरेतर, यावर्षी सलमान खान ईदला कोणताही चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याची माहिती मिळताक्षणी एकताने ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’साठी ईदची तारीख जाहीर केली. त्यानंतर शाहरूखने संधी घेत चेन्नई एक्सप्रेससाठी एरव्ही सलमानच्या मक्तेदारीमुळे न मिळणारा ईदचाच मुहूर्त प्रदर्शनासाठी निवडत एकप्रकारे त्याच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे या कसरतीत पहिल्यांदा तारीख घोषित करूनही मी का माघार घ्यावी?, हा एकताचा प्रश्न होता. तिचे म्हणणे रास्त असल्यामुळे शाहरूखला सहजासहजी मार्ग मिळणे शक्यच नव्हते. म्हणून त्याने एका कार्यक्रमात जितेंद्रला गाठून त्यांच्याकडून आश्वासन घेतले. पण, वडिलांची भूमिका एकताला पटली नव्हती.
मग शाहरूखच्या मदतीला धावला तो त्याचा मित्र केजो. करण एकताचाही चांगला मित्र असल्याने त्याने तिची मनधरणी करण्याचे ठरवले. एकताच्याचा कार्यालयात तिला गाठून, ‘असा वेडा हट्ट करू नकोस. या वादात शाहरूखचाच फायदा आहे. तुझ्या चित्रपटाचे कसे नुकसान होईल.’, अशी सारी मांडणी करण जोहरने ऐकवली. करण नेहमीच एकताच्या चित्रपटांचा प्रशंसक आहे. दोघे मिळून चित्रपट निर्मितीही करणार आहेत. त्यामुळे करण आपले नुकसान होऊ देणार नाही, याची खात्री असलेल्या एकताला आपल्या मित्राचा हा प्रेमळ पण अवघड सल्ला पचवणे भाग ठरले. त्यामुळे आता एकताचा चित्रपट ईदनंतरच्या आठवडय़ात प्रदर्शित होणार आहे. मात्र, एकताच्या माघार घेण्याच्या निर्णयामुळे के जो आणि तिच्या मैत्रीची चर्चा अधिकच गहिरी झाली आहे.
केजोच्या प्रेमळ आग्रहापुढे एकता नमली
शाहरूख खानचा ‘चेन्नई एक्सप्रेस’ आणि एकताच्या बालाजी प्रॉडक्शनचा ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई अगेन’ हे दोन्ही चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होते. मात्र, शाहरूखमुळे आता एकताला माघार घ्यावी लागली असून तिचा चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
आणखी वाचा
First published on: 14-06-2013 at 12:46 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ekta kapur bend in front of karan johars lovely force