नवी मुंबईत येणाऱ्या वाढीव वीज बिलावर तोडगा म्हणून वीज वितरण कंपनीने गेल्या आठवडय़ापासून बीलदुरुस्ती अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऐरोली विधानसभा आमदार संदीप नाईक यांनी ग्राहकांना वाढीव वीज बिल न भरण्याचे आवाहन केले होते. त्यावर वीज कंपनीने हा तोडगा काढला असून वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असल्याने ग्राहकांना वाढीव बील येत आहेत, असा खुलासा वीज वितरण कंपनीचे नवी मुंबईतील अधीक्षक अभियंता ए. एम. थोरात यांनी केला.
नवी मुंबईत विशेषत: ऐरोली परिसरात वीज ग्राहकांना या महिन्यात भरमसाट वीज बिले आली आहेत. त्यामुळे ग्राहकांत संतापाची एकच लाट उसळली आहे. ज्या ग्राहकांना एक ते दोन हजार बिल येत होते त्यांना या महिन्यात अचानक सात ते आठ हजार रुपये बिल आली आहेत. एका ग्राहकाला तर चक्क वीस हजार रुपयांचे बिल आले आहे. त्यामुळे वाढीव बिल बघून ग्राहकांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. अनेक राजकीय पक्षांनी याविरोधात आवाज उठविला असताना मानव विकास फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने गुरुवारी या विषयावर वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी आणि आमदार नाईक यांच्यात एक संवाद घडवून आणला. त्यात वाढीव बिलासंदर्भात ग्राहकांचे समाधान होत नाही तोपर्यंत कंपनीने ‘अगोदर बिल भरा’ असा तगादा ग्राहकांच्या मागे लावू नये, अशा सूचना नाईक यांनी केल्या. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता थोरात यांनी तक्रार असणाऱ्या बिलांची खातरजमा होत नाही तोपर्यंत ग्राहकांनी वाढीव बिले भरू नयेत, असा दिलासा दिला. राज्यात तीन लाखांपेक्षा जास्त वीज मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात ऐरोली परिमंडळात २२ हजार मीटर बदलण्यात येणार असून २० हजार मीटर बदलण्यात आले आहेत. या बदललेल्या मीटर्सबाबत ग्राहकांची तक्रार असण्याची शक्यता थोरात यांनी व्यक्त केली. त्यासाठी पुढील पंधरा दिवस वीज बिलदुरुस्ती अभियान सुरू करण्यात येणार असून ग्राहकांनी आपल्या वाढीव बिलासंदर्भातील तक्रारी या अभियनाअंतर्गत दूर कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. एक ऑगस्टपासून राज्य वीज वितरण कंपनीने आयोगाच्या संमतीने वीज बिल वाढ केलेली आहे. त्यामुळेही बिले वाढण्याची शक्यता थोरात यांनी व्यक्त केली पण वाढीव बिलात मोठय़ा प्रमाणात तफावत असेल तर ती नक्कीच दूर करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ज्यांनी बिले भरलेली आहेत त्यांना वाढीव बिल आले असेल तर ते पुढील बिलात सामावून घेतले जाणार आहे.