भारतीय जनता पक्षांतर्गत जिल्हय़ात प्रचंड मरगळ असताना ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्षपद मिळविण्यात मात्र कमालीची चुरस आहे. या पाश्र्वभूमीवर उद्या (बुधवारी) अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.
लोकसभा-विधानसभा निवडणुकीपाठोपाठ महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला. जिल्हा परिषदेचे संख्याबळ आठवरून चारवर खाली आले. ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष राम पाटी रातोळीकर यांच्या काळात माजी खासदार डी. बी. पाटील, भगवानराव पाटील आलेगावकर, प्रकाश कौडगे यांच्यासह अनेकांनी भाजपला रामराम ठोकला. खासदार गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजी पवार यांनी पक्ष वाढवण्याऐवजी स्वत:चे हित जपण्यातच पक्षाचा वापर केला. युतीत भाजपच्या वाटय़ाला विधानसभेच्या दोन तर नांदेड लोकसभेची जागा आहे. पक्षाला एकदा डी. बी. पाटील यांच्या रूपाने लोकसभेत संधी मिळाली होती. बहुतांश नेत्यांनी पक्षाचा वापर स्वहितासाठी केल्याने पक्ष कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. राम पाटील यांना गेल्या वेळी उघड पाठिंबा देणाऱ्या संभाजी पवार यांनी आता श्रावण भिलवंडे यांच्या नावाचा आग्रह धरला आहे. राम पाटील रातोळीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, डॉ. अजित गोपछडे हे जनाधार नसलेले पदाधिकारी अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. माजी आमदार विजय गव्हाणे यांच्या उपस्थितीत दुपारी १ वाजता महात्मा फुले मंगल कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांची बैठक होणार आहे.

Story img Loader