महापालिका निवडणुकीतील प्रचाराचा राग मनात धरून पत्रा तालीम भागात राष्ट्रवादी व भाजपच्या समर्थकांमध्ये झालेल्या दंगलीनंतर पुन्हा याच कारणावरून भाजपच्या एका समर्थकावर हल्ला करण्यात आला. बाळीवेशीत घडलेल्या या घटनेप्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी राष्ट्रवादीच्या बारा समर्थकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
राष्ट्रवादीचे नगरसेवक पद्माकर ऊर्फ नाना काळे व त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे बिज्जू प्रधाने यांच्या गटात सोमवारी पहाटे तुफानी हाणामारी झाली होती. यात एकमेकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा याच कारणावरून बाळीवेशीत प्रधाने यांच्या समर्थकांपैकी गणेश जगदीश कोरे (वय २९, रा. पश्चिम मंगळवार पेठ, बाळीवेस) याच्यावर हल्ला करण्यात आला. कोरे हा बाळीवेशीत बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरसमोर आपल्या मित्रांसोबत बोलत थांबला असता पद्माकर काळे यांच्या गटाचे पिंटू इरकशेट्टी, योगेश काकडे, धनराज शिंदे, संदीप इलामल्ले, अभिजित कांबळे आदी बारा जणांनी कोरे यास गाठले. या सर्वानी बिज्जू प्रधानेच्या ठावठिकाणा विचारला असता त्याने माहिती न दिल्याने त्याच्यावर हल्ला केला. फायबर पाइप व हॉकी स्टिकने झालेल्या या हल्ल्यात कोरे हा गंभीर जखमी झाला.
जबरी चोरीचे प्रकार
अक्कलकोट रस्त्यावर विनायक नगराजवळ गंगम्मा सिद्धाराम सोलापुरे (वय २७) ही पहाटे घराजवळील एका शेतात प्रातर्विधीसाठी गेली असता एका मोटारसायकलस्वाराने तिला ढकलून खाली पाडले व पोटावर पाय ठेऊन तिच्या गळ्यातील २२ हजारांची सोनसाखळी बळजबरीने चोरून नेली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
ऊर्मिला सुरेश घुगे (वय ४४, रा. विनायक रेसिडेन्सी, उपलप मंगल कार्यालयाजवळ, मोदीखाना) ही महिला दिवाळीनिमित्त बाजार खरेदीसाठी नवी पेठेत जाऊन ऑटोरिक्षातून घराकडे परत येत असताना चोरटय़ांनी वाटमारी करून तिच्या गळ्यातील ३० हजारांचे सोन्याचे गंठण बळजबरीने लंपास केले. ऊर्मिला घुगे ही रिक्षात बसून घराकडे परत येत असताना मोदीखान्याजवळील सज्जाद पेट्रोल पंपाजवळ वळणावर रिक्षाचालकाने वेग कमी केला. तेव्हा पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरटय़ांनी ही वाटमारी केली. सदर बझार पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे.

Story img Loader