उत्साहाच्या भरात आपण कोणत्या घोषणा देतोय हेच त्यांना उमजत नव्हते. त्यामुळे आपण देतोय त्या घोषणा प्रचार रॅलीतील आहेत की अंत्ययात्रेतील याचेच भान सुटले होते. दृश्य होते दक्षिण मुंबईतील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांच्या प्रचारफेरीतील. या संपूर्ण प्रचारफेरीत मिलिंद देवरा यांचे हार घालून स्वागत करण्यासाठी आलेल्यांना स्वत:चे टेबल घेऊन यावे लागले. हार घालून घेण्यासाठीही खाली न उतरलेले मिलिंद दगडी चाळीत मात्र चाळवासियांना भेटण्यासाठी रथातून उतरून चालत आत गेले.
भायखळ्याच्या बी. जे. मार्गावरील खटाव चाळीजवळ शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू झाली होती. गेल्या पाच वर्षांतील बहुतांश कालावधी दिल्लीतच व्यस्त असलेल्या मिलिंद देवरा प्रचारयात्रेत कार्यकर्ते त्यांची उत्सुकतेने वाट पाहत होते. भायखळा-आग्रीपाडा परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसत होता. हळूहळू सूर्य तळपू लागला आणि काँग्रेस, राष्ट्रवादी आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे झेंडे फडकविणारे घामाच्या धारांनी कासावीस होऊ लागले. तेवढय़ात काँग्रेसचा प्रचाररथ आला. आपल्या आलिशान गाडीतून आलेले मिलिंद देवरा प्रचाररथावर दाखल झाले आणि फटाक्यांच्या सलामीत कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली.
प्रचारयात्रेत सर्वात पुढे झेंडे मिरविणारी तरुणाई, त्यानंतर ठिकठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते, काही महिला आणि त्या पाठीमागे मिलिंद देवरा यांचा प्रचाररथ. प्रचाररथाच्या पाठीमागे महिलांचा लवाजमा असे सुमारे साडेतीनशे कार्यकर्त्यांची फौज होती. प्रचारयात्रा बी जे. मार्गावरून ना. म. जोशी मार्ग, आर्थर रोड नाका, सानेगुरुजी मार्ग, संत गाडगेमहाराज चौकातून पुढे सरकत होती. ‘कोई नही है टक्कर में, गिर पडोगे चक्कर में’, ‘हमारा नेता कैसा हो, मिलिंद देवरा जैसा हो’, ‘मुंबई करे पुकार, मिलिंद देवरा बार बार’, ‘हात आपका, सबका, गरीबोंका, महिलाओंका और विकास का’, ‘येऊन येऊन येणार कोण, मिलिंद देवराशिवाय आहेच कोण’ या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला होता.
तेवढय़ात एका उत्साही कार्यकर्त्यांने ‘जबतक सूरज चाँद रहेगा, मिलिंद देवरा तेरा नाम रहेगा’ अशी घोषणा दिली. अंत्ययात्रेत देण्यात येणारी घोषणा निवडणूक प्रचाराच्या मिरवणुकीत दिली गेल्याने सारेच हबकले. कार्यकत्यांमध्ये चुळबुळ सुरू झाली. प्रचारयात्रेत असताना कोणत्या घोषणा द्यायच्या हेही न कळणारे कार्यकर्ते या ताफ्यात सहभागी झाले होते. मात्र कुणीतरी प्रसंगावधान राखून या कार्यकर्त्यांला आवर घातला आणि लगेचच ‘जित गया, भाई जित गया, मिलिंद देवरा जित गया’ या घोषणा सुरू झाल्या. निकाल तर दूरच, पण मतदानही व्हायचे असताना विजयाच्या घोषणांनी मतदार पुन्हा अवाक झाले. ‘आवाज कुणाचा..’, ‘कोण म्हणतो देणार नाही..’ या शिवसेनाछाप घोषणाही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोडल्या नाहीत. सानेगुरुजी मार्गावरील कस्तुरबा रुग्णालयाबाहेरून प्रचारयात्रा पुढे जात असतानाही घोषणाबाजीला उत आला होता.
प्रचारयात्रेदरम्यान ठिकठिकाणी मिलिंद देवरा यांच्यावर फुलांचा वर्षांव होत होता. काही ठिकाणी महिला औक्षण करण्यासाठी लगबगीने पुढे येत होत्या. पण मिलिंद देवरा रथावरून खाली उतरून त्यांना सामोरे गेले नाहीत. रथावरूनच खाली वाकून आपल्या गळ्यात हार घालून घेण्याच्या त्यांच्या आग्रहामुळे इच्छुकांचा हिरमोड होत होता. मिलिंद देवरा रथातून खाली उतरत नसल्यामुळे काही ठिकाणी मतदार हारासोबत टेबलही घेऊन आले. टेबलावर चढून महिलांनी त्यांचे औक्षण केले, तर ज्येष्ठ नागरिकांनी टेबलाच्या आधाराने त्यांच्या गळ्यात हार घातला. गेल्या पाच वर्षांत दिसले नाहीत, आज

दारी आले तर रथातून उतरलेही नाहीत, असा नाराजीचा सूर नागरिक आळवत होते.
टँक पाखाडी रोडवरील मशिदीतून नमाज पठणाचा आवाज कानी पडताच तात्काळ प्रचारफेरीतील घोषणाबाजी मात्र बंद झाली. आपल्या खासदार निधीतून ठिकठिकाणी अनेक कामे केल्यामुळे मिलिंद देवरा यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. खास इमारतींच्या बाहेर रहिवाशी त्यांची वाट पाहताना दिसत होते. भायखळा (प.) येथील लंबी सिमेंट चाळीच्या बाहेर बच्चे कंपनीने राहुल गांधी यांचे पोस्टर झळकवून मिलिंद यांचे जंगी स्वागत केले.
प्रचारफेरी दगडी चाळीच्या बाहेर येताच फटाक्यांची आतशबाजी झाली. त्यावेळी दगडी चाळवासीयांनी त्यांना चाळीत येण्याचा आग्रह केला. रथामध्ये आरूढ झालेले आमदार मधु चव्हाण, भाई जगताप यांच्याशी काही क्षण चर्चा केल्यानंतर मिलिंद देवरा खाली उतरले आणि दगडी चाळीत गेले. अरुण गवळीची पत्नी आशा गवळी, वहिनी नगरसेविका भावना गवळी आणि इतर रहिवाशांच्या शुभेच्छा स्वीकारून ते पुन्हा रथावर विराजमान झाले. इतका वेळ हार स्वीकारण्यासाठीसुद्धा रथाखाली न उतरणारे मिलिंद दगडी चाळीत मात्र पायउतार होऊन चालत गेले याची चर्चा लगेच कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.
घोषणाबाजीची रेकॉर्ड सुरूच होती. एव्हाना सूर्य डोक्यावर आला होता. कडक उन्हामुळे कार्यकर्ते मलुल झाले होते. घोषणा देणाऱ्यांच्या घशाला कोरड पडू लागली. पण एका मोठय़ा टेम्पोमध्ये पाण्याची खास व्यवस्था होती. आग्रीपाडय़ातील माधवराव गांगण पथावरील बीबीडी चाळ क्रमांक २ येथे प्रचारयात्रेला पूर्णविराम मिळाला. मिलिंद देवरा प्रचाररथावरून खाली उतरले आणि गाडीत बसून निघून गेले. त्यानंतर निवडक कार्यकर्त्यांनी झेंडे, काँग्रेसची निषाणी असलेल्या हातची प्रतिकृती गोळा केली आणि तेही निवडणूक कार्यालयाच्या दिशेने निघून गेले.

 

Story img Loader