कल्याण लोकसभा मतदारसंघातील प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचारफेऱ्यांचा धडाका लावला आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची गर्दी, शक्तिप्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा लवाजमा उभा करत या फेऱ्या निघतात. यामुळे आधीच अरुंद असलेल्या कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये जागोजागी वाहतुकीची कोंडी होऊ लागली असून, डोंबिवलीतील महायुतीच्या उमेदवारासाठी निघालेली अशीच एक प्रचारफेरी एका रुग्णाच्या जिवावर उठल्याचे चित्र नुकतेच पाहावयास मिळाले. या प्रचारफेऱ्या काढताना नियमांची सर्रासपणे पायमल्ली होत असल्याचे चित्र असून, रुग्णालय असलेल्या परिसरातही वाद्यांचा आवाज कमी होत नसल्याचे चित्र आहे. डोंबिवलीतील पूर्व भागात शनिवारी डॉ. श्रीकांत िशदे यांच्या प्रचारासाठी आयरे रस्ता भागात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी वाहतूक कोंडी होऊन चारही बाजूंनी वाहने ठप्प झाली. डोंबिवलीत राहणाऱ्या डॉ. स्वाती गाडगीळ यांना तातडीने नांदिवली येथील एका रुग्णालयात रक्तस्राव होत असलेल्या रुग्णाच्या उपचारांसाठी जायचे होते. आयरे रस्ता भागात प्रचारफेरीतील गर्दी रस्त्यावरून हटायला तयार नव्हती. कार्यकर्ते रस्ता करून देत नसल्याने डॉ. गाडगीळ यांना वाहन बंद करून रस्त्याच्या कडेला उभे राहावे लागले. रस्त्यावर उतरून डॉ. गाडगीळ यांनी कार्यकर्त्यांना रस्ता तयार करून द्या म्हणून विनंती केली. या विनंतीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. स्वाती गाडगीळ यांनी थेट उपमहापौर राहुल दामले तसेच एका ज्येष्ठ पत्रकाराला भ्रमणध्वनीवर संपर्क करून प्रचारफेरीतील कार्यकर्त्यांना गर्दीतून वाट काढण्यासाठी सहकार्य करावे म्हणून संपर्क केला. त्याचाही काही उपयोग झाला नाही. शेवटी दोन, चार कार्यकर्त्यांना कीव आल्याने त्यांनी वाट काढून देण्यासाठी पुढाकार घेतला. डॉ.गाडगीळ रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच वेळ वाया गेला. रुग्णालयात पोहचल्यावर तातडीने ‘त्या’ रुग्णावर उपचार सुरू केले. प्रचारफे ऱ्या काढताना रस्त्याच्या एकेरी बाजूची वाहतूक सुरू राहील, अशी व्यवस्था उमेदवारांच्या प्रचारप्रमुखांनी करावी. रुग्णालयाजवळून प्रचारफेरी नेत असताना वाद्यांचा आवाज कमी करावा. संध्याकाळच्या वेळेत प्रचारफेरीचे काटेकोर नियोजन करून वाहतूक कोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

सायंकाळची कोंडी ठरलेली
उन्हाच्या झळा कमी होताच सायंकाळी पाच ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत कल्याण डोंबिवलीच्या अनेक भागात उमेदवारांकडून प्रचारफे ऱ्या काढण्यात येतात. या मिरवणुकीत वाहनांचा मोठा भरणा असतो. याच वेळेत चाकरमानी घरी परतत असतात. प्रचारफेऱ्यांमुळे मोठय़ा प्रमाणावर कोंडी होत असल्यामुळे नागरिकांना घरी परतताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक या प्रचारफेरीच्या नावाने बोटे मोडत घरचा प्रवास करतात. वाहतूक पोलिसांची यंत्रणाही या काळात निकामी ठरल्याचे चित्र दिसू लागले आहे.

Story img Loader