काँग्रेस आघाडीने शहराच्या मध्यवर्ती भागात काढलेली भव्य फेरी.. मनसेने विस्कळीत मोटारसायकल फेरीद्वारे पिंजलेला पंचवटी परिसर.. शिवसेनेने कॉलेज रोड व गंगापूर रोड परिसरात फोडलेली डरकाळी.. बसपने सातपूर व नाशिकरोड भागात तर आम आदमी पक्षाने आडगाव, नाशिकरोड व सातपूर कॉलनी परिसरात काढलेली रॅली.. जाहीर प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मंगळवारी सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी प्रचार फेरींद्वारे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. सलग तीन ते चार आठवडय़ांपासून शहरासह ग्रामीण भागात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा सायंकाळी थंड झाल्या.
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर लगेच बहुतेक राजकीय पक्षांनी आपापल्या उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यामुळे प्रत्येकाला प्रचारासाठी नेहमीपेक्षा अधिक कालावधी मिळाला. या काळात भेटीगाठी, स्नेहभोजन, जाहीर सभा, चौक सभा, ध्वनिक्षेपक अन् थ्रीडीद्वारे दिग्गज नेत्यांच्या भाषणाचे सादरीकरण अशा अनेक मार्गानी चाललेल्या प्रचाराने वातावरण ढवळून निघाले. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचाराचा मंगळवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात सुरुवातीपासून लावलेला जोर अखेरच्या दिवशीपर्यंत कायम राखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. काँग्रेस आघाडीतर्फे छगन भुजबळ यांच्या प्रचारार्थ महात्मा गांधी रस्त्यावरून प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. सकाळपासून टेम्पो, खासगी बस अशा मिळेल त्या वाहनातून महिलांचे जथ्थेच्या जथ्थे या ठिकाणी येत होते. सकाळी अकरा वाजता काँग्रेस आघाडीच्या भव्य रॅलीला सुरुवात झाली. डोक्यावर घडय़ाळ्याच्या टोप्या आणि हाती पक्षाचे झेंडे घेऊन शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले. प्रचाररथावर भुजबळ यांच्यासमवेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, शहराध्यक्षा अश्विनी बोरस्ते, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी उपस्थित होते. अत्याधुनिक ध्वनिक्षेपक यंत्रणेद्वारे प्रचार करणारी वाहने, काही वाहनांत पोवाडे गाणारी पथके, ढोल-पथकेया साऱ्यांचा एकाच वेळी गलका उडाल्याने नागरिकांना त्यावर चाललेला प्रचार नीटसा कळला नाही. अशोकस्तंभ, रविवार कारंजा, मेनरोड, दामोदर चित्रपटगृह, अब्दुल हमीद चौक, खडकाळी, त्र्यंबकनाका सिग्नल, सीबीएसमार्गे फेरीचा काँग्रेस कमिटीत समारोप झाला. हजारो पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून काँग्रेस आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या मोटारसायकल व वाहनांच्या फेरीला दुपारी बारा वाजता पंचवटी कारंजापासून सुरुवात झाली. शर्मिला ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ‘रोड शो’ होणार असल्याचे सांगितले गेले होते. परंतु, ठाकरे यांना तातडीच्या कामामुळे मुंबईला जावे लागल्याने त्या या फेरीत सहभागी झाल्या नाहीत. मनसेच्या फेरीचा मार्ग सर्वाधिक अंतराचा असावा. दोनशे ते तीनशे मोटारसायकलवर झेंडे घेऊन सहभागी झालेले कार्यकर्ते, महिला पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घातलेले फेटे आणि उघडय़ा जीपवरून मतदारांना अभिवादन करत फेरीला सुरुवात झाली. मखमलाबाद नाक्याजवळ फटाक्यांचा आतषबाजीत फेरीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. भरधाव निघालेल्या रॅलीत प्रारंभी दिसणारी वाहनांची गर्दी नंतर मात्र विस्कळीत झाली. काही मोटारसायकल मुख्य जीपच्या मागून निघाले असताना काही वाहनधारक अन्य रस्त्यांवर भरकटले. त्यामुळे मखमलाबादहून दिंडोरी रस्त्यावर आलेल्या फेरीत अतिशय तुरळक वाहने शिल्लक राहिल्याचे दिसले. आडगाव नाका, हिरावाडी, कमलनगर, विडी कामगारनगर, सरस्वतीनगर, तपोवन, नागचौक, ढिकलेनगर, रामकुंडमार्गे फेरीचा पंचवटी कारंजा येथे समारोप झाला.
महायुतीचे हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ सेना-भाजप-रिपाइं युतीने भव्य फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले. भगवे झेंडे व भगव्या टोप्या परिधान करून हजारो महिला व पुरुष कार्यकर्ते टळटळीत उन्हात सहभागी झाले. उघडय़ा जीपवरून गोडसे यांच्यासमवेत संपर्कनेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते आदी सहभागी झाले होते. परंतु, तेथे भाजपचा एकही पदाधिकारी नव्हता. या संदर्भात विचारणा केली असता ते फेरीत सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. ध्वनिक्षेपकावरून वाघ आला रे वाघ आल्याच्या.. डरकाळ्या फोडत निघालेली फेरी कॉलेजरोड, भोसला महाविद्यालय चौक, जेहान सर्कल, गंगापूर रोडमार्गे डोंगरे वसतिगृह मैदानावर आली. या ठिकाणी फेरीचा समारोप झाला. बसपच्या वतीने दिनकर पाटील यांच्या प्रचारार्थ सातपूर, गंगापूर रोड, चोपडा लॉन्स, रामवाडी, म्हसरूळ, आडगाव नाका, जुने नाशिक, टाकळी रोडमार्गे जेतवन नगर, दत्त मंदिर रोड, देवळाली गाव, विहीत गाव, पाथर्डी, चुंचाळे, अशोकनगर अशी प्रचारफेरी काढण्यात आली. आम आदमी पक्षाने विजय पांढरे यांच्या प्रचारार्थ शहरातील दोन वेगवेगळ्या भागांत फेरी काढून शक्तिप्रदर्शन केले. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी या स्वरूपाचे शक्तिप्रदर्शन माकपला करता आले नाही. शहरातील वेगवेगळ्या भागांत निघालेल्या फेऱ्यांनी प्रचार शिगेला पोहोचवला. टळटळीत उन्हात उमेदवारांबरोबर कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक झाली. यामुळे प्रत्येक फेरीत प्रारंभी दिसणारा उत्साह समारोपावेळी मात्र दृष्टिपथास पडला नाही. पायी चालून आणि घोषणाबाजी केल्यामुळे कार्यकर्ते मरगळल्याचे पाहावयास मिळाले.

उमेदवार व यंत्रणाही सतर्क
जाहीर प्रचार संपुष्टात आला असला तरी छुप्या पद्धतीने अंतिम व्यूहरचना करण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे. झोपडपट्टीमध्ये एकगठ्ठा मतांसाठी प्रलोभन दाखविले जाण्याची शक्यता असल्याने उमेदवारांबरोबर निवडणूक यंत्रणाही सतर्क झाली आहे. मतांसाठी पैसे वाटपाचे प्रयत्न होऊ नयेत, याकरिता अशा परिसराकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी संपुष्टात आली. जाहीरपणे प्रचार करण्यास र्निबध असले तरी उमेदवार व समर्थकांकडून छुप्या मार्गाने प्रचार सुरू झाला आहे. लघुसंदेश, दूरध्वनी वा तत्सम मार्गानी या काळात प्रचार होईल. मतदानाच्या आधीचे हे दोन दिवस अतिशय महत्त्वपूर्ण असतात. या काळात मतदारांना पैसे वा मद्याचे प्रलोभन दाखविण्याची अधिक शक्यता असते. या दिवसांचे महत्त्व राजकीय पक्षांना चांगलेच ज्ञात असते. मतदारांना प्रलोभन दाखवून निकालावर परिणाम करू शकतील, अशा घडामोडी या दोन दिवसांत घडू शकतात. यामुळे सर्वच राजकीय पक्ष विरोधी उमेदवार व त्यांच्या समर्थकांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला झोपडपट्टय़ांमध्ये पैसे वा मद्याचे वाटप होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते. असे प्रकार घडल्यास आपल्या उमेदवाराच्या मतांवर परिणाम होईल याची जाणीव असल्याने पदाधिकारी व कार्यकर्ते संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. राजकीय पक्षांप्रमाणे निवडणूक यंत्रणाही डोळ्यात अंजन घालून कामाला लागली आहे. मतदारांना मतांसाठी प्रलोभन दाखविणे बेकायदेशीर आहे. कोणी असा प्रयत्न करत असल्यास तक्रार देण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.