यंदा शासकीय यंत्रणेकडून मतदारांना त्यांच्या यादीतील क्रमांकांच्या पावत्यांचे वाटप केले जात असले तरी राजकीय पक्षांना पावत्या वाटण्यास बंदी घालण्यात आलेली नाही. मात्र तो खर्च उमेदवारांच्या निवडणूक हिशेबात मांडला जाईल, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी माधवी सरदेशमुख यांनी दिली. मात्र मतदारांनी केंद्रात येताना शासनानेच दिलेल्या पावत्या घेऊन यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. यंदा निवडणूक आयोगाच्या वतीने नागरिकांना मतदान यादीतील क्रमांकाच्या पावत्यांचे घरपोच वाटप करण्यात येत असून या कामामुळे शासकीय कर्मचाऱ्यांची पुरती दमछाक झाली आहे. मतदारांना शोधण्यासाठी या कर्मचाऱ्यांना पक्ष कार्यकर्त्यांचाच आधार घ्यावा लागत आहे. ठाणे जिल्ह्य़ातील ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदार संघांमध्ये २४ एप्रिल रोजी मतदान होणार असून मतदारांना मतदार यादीतील आपला क्रमांक लगेच समजावा यासाठी निवडणूक आयोगा बरोबरच राजकीय पक्षही मतदार यादीतील क्रमांकाच्या पावत्या वाटत आहेत. या पावत्या वाटप करण्यावर निवडणूक आयोगाच्या वतीने लक्ष ठेवले जात आहे. कारण त्याच्या खर्चाचा हिशेब उमेदवारांना दाखवावा लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या वतीने कर्मचारी, शिक्षकांच्या मदतीने मतदारांना यादीतील क्रमांकाच्या पावत्या वितरित केल्या जात असून ते काम अतिशय जिकिरीचे आहे. पावत्या वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठय़ा अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. चाळीच्या जागी इमारती उभ्या, मतदारांचे स्थलांतर, घर भाडय़ाने दिले, घर विकले तर काही ठिकाणी मतदारांचा पत्ताच नसल्याने अशा मतदारांच्या पावत्या पोहचवायच्या कशा असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा