कोणतीही निवडणूक म्हटली की प्रचारासाठी राजकीय पक्ष आणि कार्यकर्ते यांना पक्षाचे झेंडे, बॅनर्स, उपरणी बिल्ले या वस्तूंची मोठय़ा प्रमाणात आवश्यकता भासते. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत चढत्या भाजणीप्रमाणे या वस्तूंची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. मुंबईत लालबाग-परळ येथे निवडणूक प्रचार साहित्य विक्रीची मोठी उलाढाल होत असते. मुंबई शहर आणि उपनगरात प्रचारफेऱ्या आणि पदयात्रा सुरू झाल्या असल्या तरी निवडणूक प्रचार साहित्य विक्रीला अद्याप म्हणावा तसा उठाव आलेला नाही. निवडणूक प्रचार साहित्य विक्रीला उठाव येण्याची वाट येथील व्यावसायिक पाहात आहेत.
मुंबई आणि उपनगरातील मतदान २४ एप्रिल रोजी होणार आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज आता भरले गेले आहेत. विविध उमेदवारांच्या निवडणूक प्रचार सभा, पदयात्रा, निवडणूक प्रचार फेऱ्या, चौकसभानाही आता सुरुवात झाली आहे.मात्र तरीही या विक्रीला अद्याप म्हणावा तसा जोर चढलेला नसल्याचे लालबाग येथील काही विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
पुढील आठवडय़ात राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापायला सुरुवात होईल. निवडणूक प्रचार फेऱ्या, पदयात्रा, जाहीरसभा यांची संख्या जशी वाढेल, तसे या साहित्याच्या विक्रीलाही अधिक जोर येईल, असे एका दुकानदाराने सांगितले.
तर आता दुकानात फारशी गर्दी नसल्याने तुमच्याशी बोलता तरी येत आहे. पण एकदा का निवडणुकीचे वातावरण तापायला सुरुवात झाली की बोलायलाही वेळ मिळणार नाही, असे एक व्यावसायिक म्हणाला.
सध्या नरेंद्र मोदी यांच्या मुखवटय़ांना जास्त प्रमाणात मागणी आहे. तर शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मुखवटय़ांची नोंदणी मुंबई बाहेरील एका ठिकाणाहून करण्यात आली आहे. राजकीय पक्षांचे निवडणूक चिन्ह असलेल्या टोप्यांचीही चांगली विक्री होते.
चायना बनावटीची टोपीची किंमत ४ रुपयाला एक तर ‘रोटो’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका टोपीची किंमत ८ रुपये आहे. राजकीय पक्षाच्या नेत्यांचे छायाचित्र असलेला एक टी शर्ट ८५ रुपयांना आहे. निवडणूक चिन्ह असलेले बिल्ले २ ते १० रुपये किंमतीला एक या प्रमाणे विकले जात आहेत.
निवडणूक प्रचार साहित्याचे दर
झेंडा (सर्वसाधारण आकार) ४ ते १२ रुपयांना एक उपरणे- कापडी- ५ ते १५ रुपयांना एक,
सॅटीन- २५ ते ३० रुपयांना एक
टी शर्ट- ८८ ते १०० रुपयांना एक
मुखवटे- ४ ते १० रुपयांना एक